आरसीयूचा चौदावा दीक्षांत सोहळा आज
राज्यपाल थावरचंद गेहलोत राहणार उपस्थित : तिघांना मानद डॉक्टरेट
बेळगाव : राणी चन्नमा विद्यापीठ (आरसीयू) चा चौदावा वार्षिक दीक्षांत सोहळा मंगळवार दि. 25 रोजी होणार आहे. सकाळी 11.30 वाजता हलगा येथील सुवर्ण विधानसौध सभागृहात हा सोहळा होणार आहे. दीक्षांत सोहळ्याला राज्यपाल थावरचंद गेहलोत उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून उच्चशिक्षण मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर व इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री ए. एस. किरणकुमार उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु सी. एम. त्यागराज यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावर्षीच्या दीक्षांत सोहळ्यात विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या तीन व्यक्तींना मानद डॉक्टरेट प्रदान केली जाणार आहे.
पर्यावरण आणि ग्रामीण विकास विभागातून ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते डॉ. शिवाजी कागणीकर, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव विनोद दोड्डण्णावर तर समाजसेवा व साहित्य विभागात विजापूरचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार यांना मानद डॉक्टरेट दिली जाणार आहे. यावर्षी 36 हजार 642 विद्यार्थ्यांनी पदवी तर 1 हजार 843 विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. त्यापैकी 125 जणांनी सर्वोत्तम रँक मिळविल्याचे सांगण्यात आले. पदव्युत्तर निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या 50 दिवसात दीक्षांत सोहळा आयोजित करणारे आरसीयू हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. आयआयटी मुंबईकडून इमर्जिंग युनिव्हर्सिटीचा पुरस्कारही मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विद्यापीठाच्या विकासासाठी शंभर कोटींचे अनुदान देण्यात आले असून यातून विद्यापीठाचा सर्वांगीण विकास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. 2010 मध्ये भुतरामहट्टी येथे सुरू झालेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत गेला. सध्या विद्यापीठांतर्गत बेळगाव जिल्ह्यातील 227 तर विजापूर जिल्ह्यातील 145 महाविद्यालयांचा समावेश आहे. 1 लाख 39 हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स व एज्युकेशन क्षेत्रामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हिरेबागेवाडी येथे विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसचे काम सुरू असून लवकरच त्या ठिकाणी सुसज्ज विद्यापीठ सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी रजिस्ट्रार संतोष कामगौडा व फायनान्स ऑफिसर एम. ए. सपना उपस्थित होत्या.