For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीबीची विजयी हॅट्ट्रिक

06:58 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरसीबीची विजयी हॅट्ट्रिक
Advertisement

गुजरात टायटन्सवर 4 गडी राखून मात : डु प्लेसिसच्या 23 चेंडूत 63 धावा  

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सवर 4 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावरून थेट सातव्या स्थानी झेप घेतली आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही कायम ठेवल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना गुजरातचा डाव 147 धावांवर आटोपला. यानंतर आरसीबीने विजयी आव्हान 13.4 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पार केले. डु प्लेसिसने धमाकेदार अर्धशतकी खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले. 29 धावांत 2 बळी घेणाऱ्या आरसीबीच्या मोहम्मद सिराजला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि फाफ डू प्लेसिसने पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक 92 धावांची भागीदारी रचली. फाफने आरसीबीसाठी दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने अवघ्या 23 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. तर विराटने 27 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. यानंतर विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमरून ग्रीन यांनी झटपट विकेट गमावल्याने आरसीबीला लागोपाठ 4 धक्के बसले. या सामन्यात दिनेश कार्तिक पुन्हा एकदा आरसीबीसाठी तारणहार ठरला. दिनेश कार्तिक आणि स्वप्नील सिंग यांनी मैदानावर टिकून राहत संघाला 14 व्या षटकांतच विजय मिळवून दिला. कार्तिकने 12 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 21 धावा तर स्वप्निलने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 15 धावा केल्या. गुजरातकडून जोश लिटीलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दरम्यान, यंदाच्या आयपीएलमधील आरसीबीचा हा चौथा विजय ठरला आहे. या विजयासह त्यांनी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत तर पराभवामुळे गुजरातच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गुजरातची पराभवाची मालिका कायम

प्रारंभी, आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सची डावाची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद सिराजने डावातील दुसऱ्याच षटकात गुजरातला पहिला धक्का दिला. सलामीवीर वृद्धीमान साहा एका धावेवर बाद झाला. यानंतर सिराजने आपल्या पुढील षटकात गुजरातचा कर्णधार शुभमन गिललाही तंबूचा रस्ता दाखवला. त्याला केवळ दोनच धावा करता आल्या. साई सुदर्शनही स्वस्तात बाद झाल्याने गुजरातची 3 बाद 19 अशी स्थिती झाली होती.

टॉप ऑर्डर फेल झाल्यानंतर शाहरुख खान व डेव्हिड मिलर यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी साकारली. 30 धावांवर मिलरला कर्ण शर्माने बाद करत ही जोडी फोडली. यानंतर शाहरुख खानही रन आऊट झाला. त्याने 24 चेंडूत सर्वाधिक 37 धावा केल्या. मिलर व शाहरुख खान लागोपाठ बाद झाल्यानंतर राहुल तेवतिया व रशीद खान यांनी फटकेबाजी करत संघाला शतकी मजल मारुन दिली. तेवतियाने 35 तर रशीद खानने 18 धावांचे योगदान दिले. राहुल तेवतियाने या दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर शेवटच्या हाणामारीच्या षटकात तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्याने गुजरातचा डाव 19.3 षटकांत 147 धावांवर आटोपला. आरसीबीकडून यश दयाल, मोहम्मद सिराज व वैशाख यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स 19.3 षटकांत सर्वबाद 147 (वृद्धीमान साहा 1, शुभमन गिल 2, साई सुदर्शन 6, एम शाहरुख खान 37, डेव्हिड मिलर 30, राहुल तेवतिया 35, रशीद खान 18, विजय शंकर 10, मोहम्मद सिराज, यश दयाल व विजयकुमार वैशाख प्रत्येकी दोन बळी, कॅमरुन ग्रीन व कर्ण शर्मा प्रत्येकी एक बळी).

रॉयल चँलेजर्स बेंगळूर 13.4 षटकांत 6 बाद 152 (विराट कोहली 27 चेंडूत 42, डु प्लेसिस 23 चेंडूत 10 चौकार व 3 षटकारासह 64, दिनेश कार्तिक नाबाद 21, स्वप्नील सिंग नाबाद 15, जोस लिटल 45 धावांत 4 बळी, नूर अहमद 2 बळी).

Advertisement
Tags :

.