आरसीबीचा हैदराबादला पराभवाचा धक्का
आरसीबी 35 धावांनी विजयी, सामनावीर रजत पाटीदार, विराट कोहलीची अर्धशतके, ग्रीनची अष्टपैलू चमक
वृत्तसंस्था /हैदराबाद
करो या मरोच्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 7 बाद 206 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल हैदराबादचा संघ 171 धावांपर्यंत मजल मारु शकला. या विजयासह आरसीबीने प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवले आहे. 20 चेंडूत 50 धावांची आक्रमक खेळी साकारणाऱ्या रजत पाटीदारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आरसीबीचा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय असून चार गुणासह ते शेवटच्या स्थानी आहेत. पराभवानंतरही हैदराबादचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. आरसीबीनं दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. हैदराबादचा अर्धा संघ 69 धावांत तंबूत परतला होता. ट्रेविस हेड फक्त 1 धाव काढून बाद झाला. एडन मॅरक्रम सात धावा काढून तंबूत परतला. हेनिरक क्लासेन 7 आमि नितीश रे•ाr 13 धावा काढून बाद झाले. सलामी फलंदाज अभिषेक शर्मा यानं सुरुवातीला फटकेबाजी केली, पण यश दयालनं त्याचा अडथळा दूर केला. अभिषेक शर्माने 13 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी केली. आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी लढा दिला. पण इतर फलंदाजांकडून त्यांना साथ मिळाली नाही. अब्दुल समद फक्त दहा धावा काढून बाद झाला. भुवनेश्वर कुमारने 13 धावा केल्या. पॅट कमिन्सने 15 चेंडूमध्ये तीन षटकाराच्या मदतीने 31 धावांचा पाऊस पाडला. तर शाहबाज अहमद अखेरपर्यत पाय रोवून उभा राहिला. त्यानं 37 चेंडूमध्ये 40 धावांचं योगदान दिले. घरच्या मैदानावर हैदराबादला 8 गडी गमावत 171 धावापर्यंत मजल मारता आली.
रजत पाटीदार, विराटची अर्धशतके
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आरसीबीला वेगवान सुरुवात दिली. दोघांनी 23 चेंडूमध्ये 48 धावांची भागिदारी केली. कर्णधार डु प्लेसिसने 12 चेंडूमध्ये 25 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने एक षटकार आणि तीन चौकार ठोकले. डु प्लेसिस बाद झाल्यानंतर विल जॅक्स सहा धावा काढून बाद झाला. लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने रजत पाटीदारला सोबत घेत संघाला सावरले. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 65 धावांची भागीदारी साकारली. पाटीदारने अवघ्या 20 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीमध्ये पाच षटकार आणि दोन चौकार ठोकले. दुसऱ्या विराटने संयमी खेळी साकारताना 43 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 51 धावांचे योगदान दिले. पाटीदार व विराटला उनादकटने बाद केले. विराट बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोरही (7 धावा) लगेच तंबूत परतला. लागोपाठ विकेट जात असताना दुसऱ्या बाजूला कॅमरुन ग्रीनने आक्रमक फलंदाजी करत होता. दमदार फॉर्ममध्ये असलेला दिनेश कार्तिक या सामन्यात करिश्मा दाखवू शकला नाही. 6 चेंडूत 11 धावा काढून तो आऊट झाला. यानंतर स्वप्निल सिंगने सहा चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 12 धावांचे योगदान दिले तर कॅमरुन ग्रीनने आरसीबीला फिनिशिंग टच दिला. ग्रीनने 20 चेंडूमध्ये 37 धावांची केळी केली. या जोरावर आरसीबीने 20 षटकांत 7 बाद 206 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी 20 षटकांत 7 बाद 206 (डु प्लेसिस 25, विल जॅक्स 6, विराट कोहली 51, रजत पाटीदार 50, कॅमरुन ग्रीन नाबाद 37, दिनेश कार्तिक 11, स्वप्नील सिंग 12, उनादकट 30 धावांत 3 बळी, नटराजन 2 तर पॅट कमिन्स व मार्कंडेय प्रत्येकी एक बळी).
हैदराबाद 20 षटकांत 8 बाद 171 (अभिषेक शर्मा 31, शाहबाज अहमद नाबाद 40, कमिन्स 31, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा व कॅमरुन ग्रीन प्रत्येकी दोन बळी, सिराज व जॅक्स प्रत्येकी एक बळी).
विराट कोहली...इस बारही चारसौ पार...
आयपीएलमध्ये आरसीबीचा संघ खराब कामगिरीमुळे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाण्याच्या स्थितीत आहे, पण दुसरीकडे विराट कोहली मात्र आपले काम चोख बजावत आहे. यंदाच्या हंगामात 400 धावा करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज असून ऑरेंज कॅपही त्याच्याकडेच आहे. 400 धावांचा टप्पा पार करताच विराटच्या नावे अनोखा विक्रम झाला आहे. विराटने आयपीएलच्या 10 हंगामात 400 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. दहा हंगामात 400 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज ठरला आहे.