For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीबीचा 8 गड्यांनी दणदणीत विजय

10:25 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरसीबीचा 8 गड्यांनी दणदणीत विजय
Advertisement

यूपी वॉरियर्सचा दारुण पराभव, ग्रेस हॅरीस सामनावीर 

Advertisement

वृत्तसंस्था/बडोदा

महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथे गुरूवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात कर्णधार स्मृती मानधना आणि ग्रेस हॅरीस यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाने यूपी वॉरियर्सचा 41 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. हा या स्पर्धेतील 18 वा सामना आहे. आरसीबीच्या ग्रेस हॅरीसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आरसीबीने 8 सामन्यांतून 12 गुणांसह प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे.

Advertisement

गुजरात जायंट्स 8 गुणांसह दुसऱ्या तर मुंबई इंडियन्स 6 गुणांसह तिसऱ्या, दिल्ली कॅपिटल्स 6 गुणांसह चौथ्या आणि यूपी वॉरियर्स 4 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून यूपी वॉरियर्सला प्रथम फलंदाजी दिली. यूपी वॉरियर्सने 20 षटकांत 8 बाद 143 धावा जमविल्या. त्यानंतर आरसीबीने 13.1 षटकांत 2 बाद 147 धावा जमवित एकतर्फी विजय नोंदविला. यूपी वॉरियर्सच्या डावात सलामीच्या  दिप्ती शर्माने 43 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 55, कर्णधार लेनिंगने 30 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 41 धावा जमविल्या.

लेनिंग आणि दिप्ती यांनी सलामीच्या गड्यासाठी 49 चेंडूत 74 धावांची भागिदारी केली. देवोलने 2 चौकारांसह 14, सिमरन शेखने 1 चौकारासह 10, सेहरावतने 7, ट्रायोनने 6 तर अॅमी जोन्सने केवळ 1 धाव जमविली. यूपी वॉरियर्सच्या डावात 2 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. आरसीबीतर्फे  डी क्लर्कने 22 धावांत 4 तर हॅरीसने 22 धावांत 2 तसेच बेल आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ग्रेस हॅरीस आणि कर्णधार स्मृती मानधना यांनी 55 चेंडूत 108 धावांची शतकी भागिदारी सलामीच्या गड्यासाठी केली. हॅरीसने आक्रमक फटकेबाजी करताना 37 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारासह 75 धावा झोडपल्या. कर्णधार मानधनाने 27 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 54 नाबाद 54 धावा जमविल्या. व्हॉलने 15 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा केल्या. 13.1 षटकांत आरसीबीने विजयाचे उद्दिष्ट गाठले.

संक्षिप्त धावफलक : यूपी वॉरियर्स 20 षटकांत 8 बाद 143 (दिप्ती शर्मा 55, लेनिंग 41, देवोल 14, शेख 10, अवांतर 9, डी क्लर्क 4-22, हॅरीस 2-22, बेल व श्रेयांका पाटील प्रत्येकी 1 बळी), आरसीबी 13.1 षटकांत 2 बाद 147 (ग्रेस हॅरीस 75, स्मृती मानधना नाबाद 54, व्हॉल 16, अवांतर 2, शिखा पांडे व आशा शोभना प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.