‘आरसीबी’ फायनलमधील स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात
वृत्तसंस्था/ बडोदा
गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघ सलग दोन पराभवांनंतर फलंदाजीतील चुका सुधारून महिला प्रीमियर लीगमध्ये आज गुऊवारी होणाऱ्या कमकुवत यूपी वॉरियर्सविऊद्धच्या सामन्यात अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.
आरसीबी (10 गुण) हा आतापर्यंत प्लेऑफसाठी पात्र ठरलेला एकमेव संघ आहे आणि यूपी वॉरियर्सवर विजय मिळवल्यास त्यांचे गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये स्थान निश्चित होईल तसेच अंतिम फेरीतही प्रवेश मिळेल. दुसरीकडे, प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी खडतर आव्हानाचा सामना करणाऱ्या यूपी वॉरियर्स संघाला त्यांची आघाडीची फलंदाज फोबी लिचफिल्ड (243 धावा) हिच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. तिच्या जागी एमी जोन्सला संघात स्थान देण्यात आले आहे.
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील संघाला अजूनही काही काम करायचे आहे. त्यांनी सलग पाच विजय मिळवून इतर संघांपेक्षा आपली श्रेष्ठता सिद्ध केली होती, परंतु त्यानंतरच्या दोन पराभवांनी त्यांच्या मोहिमेला नक्कीच धक्का बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सविऊद्धच्या सामन्यात फलंदाजांच्या सामूहिक अपयशामुळे आरसीबीला सात गडी राखून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर, 2024 च्या विजेत्या संघाला मुंबई इंडियन्सविऊद्ध पाटा खेळपट्टीवर आणखी एका मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तिथे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्यांची अवस्था 5 बाद 35 अशी झाली होती. परंतु रिचा घोषच्या 50 चेंडूंतील 90 धावांच्या स्फोटक खेळीमुळे पराभवाचे अंतर लक्षणीयरीत्या कमी झाले.
मुंबई इंडियन्सने जोरदार सुऊवात केली आणि नॅट सायव्हर-ब्रंटच्या स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्या शतकाच्या जोरावर आरसीबीसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले. या प्रक्रियेत मुंबईने आरसीबीच्या गोलंदाजांची कमजोरी उघड केली, विशेषत: एका टप्प्यात जेव्हा इंग्लंडची कर्णधार व हेली मॅथ्यूजने चौकारांची बरसात करत 131 धावांची भागीदारी केली आणि गोलंदाजांना हतबल केले. त्यामुळे लॉरेन बेलवर (11 बळी) खूप काही अवलंबून असेल, परंतु तिला सायली सातघरे (8 बळी) आणि नादिन डी क्लर्क (11 बळी) यांच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
गुणतालिकेत तळाशी असलेल्या यूपी वॉरियर्ससाठी ही आता ‘करो या मरो’ची परिस्थिती आहे. कारण अंतिम तीनमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना इतर सामन्यांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. यूपी वॉरियर्सने सहा सामन्यांमधून केवळ दोन विजय आणि चार गुण मिळवले आहेत. तसेच त्यांचा निव्वळ धावगती दर उणे 0.769 इतका खराब आहे, याचा अर्थ त्यांना गमावलेली आघाडी भरून काढण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक आहे. इतर चार संघांच्या तुलनेत यूपी वॉरियर्सकडे आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध असे दोन सामने शिल्लक आहेत. त्याद्वारे ते अंतिम प्रयत्न करून आठ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. परंतु त्याचबरोबर त्यांना गुजरात जायंट्सने मुंबई इंडियन्सला हरवणे देखील आवश्यक आहे.
जर गुजरात जायंट्स मुंबई इंडियन्सकडून हरले, तर समीकरण संघांच्या निव्वळ धावगती दरावर आधारून असेल आणि याच ठिकाणी यूपी वॉरियर्सला खूप सुधारणा करावी लागेल. त्यामुळे कर्णधार लॅनिंग (207 धावा) आणि भारतीय स्टार हरलीन देओल (150) यांच्यावर बरीच भिस्त असेल. यूपी वॉरियर्सला अव्वल स्थानावरून लिचफिल्डच्या बाहेर पडण्यामुळे निर्माण झालेली पोकळीही भरावी लागेल. सोफी एक्लेस्टोन (6 बळी) आणि दीप्ती शर्मा (5) ही फिरकी जोडी आरसीबीच्या फलंदाजांना रोखण्यात यशस्वी होईल, अशी आशाही त्यांना असेल.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.