आरसीबीने 10 वर्षानंतर भेदला मुंबईचा बालेकिल्ला
रोमांचक लढतीत मुंबई 12 धावांनी पराभूत : कृणाल पंड्या ठरला मॅचविनर : विराट-रजतची तुफानी अर्धशतके
वृत्तसंस्था/ मुंबई
तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी तुफानी फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणले होते, पण मुंबईवर विजय रुसल्याचेच पहायला मिळाले. या दोघांनी मोक्याच्या क्षणी आपल्या विकेट्स गमावल्या आणि त्यामुळेच मुंबईचा संघ पराभूत झाला. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने 221 धावांचा डोंगर उभारला होता. पण मुंबईला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना 209 धावापर्यंतच मजल मारता आली आणि आरसीबीने त्यांचा 12 धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, आरसीबीने 10 वर्षांनंतर वानखेडेचे चक्रव्यूह भेदत रोमांचक विजयाची नोंद केली आहे. यापूर्वी 2015 मध्ये मुंबईविरुद्ध विजय मिळवला होता.
आरसीबीने दिलेल्या 222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. रोहित शर्मा 9 चेंडूत 2 चौकार आणि एक षटकार लगावत 17 धावा करून बाद झाला. तर काही वेळाने रायन रिकल्टनही 17 धावा करत पायचीत झाला. धावा काढण्यासाठी झगडत असलेला विल जॅक्स 22 धावा करत माघारी परतला. सूर्यकुमार यादवलाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. 5 चौकारासह 28 धावांचे योगदान त्याने दिले.
तिलक-हार्दिकची धडाकेबाज खेळी वाया
दरम्यान, तिलक वर्मा 29 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची तुफानी खेळी साकारली. त्याला हार्दिकने 15 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारासह 42 धावा करत चांगली साथ दिली. या जोडीने 89 धावांची भागीदारी करत एकवेळ मुंबईला विजयासमिप आणले होते. पण, मोक्याच्या क्षणी तिलक भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ हार्दिकलाही हेजलवूडने माघारी पाठवले. ही जोडी बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी निराशा केली. यामुळे मुंबईला 9 बाद 209 धावापर्यंतच मजल मारता आली. शेवटच्या षटकात कृणाल पंड्याने शानदार गोलंदाजी करत आरसीबीच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्याने 45 धावांत 4 बळी घेतले.
कोहली-रजत पाटीदारचा तडाखा
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बोल्टने पहिल्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर फिल सॉल्टला क्लीन बोल्ड करत शानदार सुरुवात करून दिली. विराट आणि देवदत्त पडिकल यांनी 52 चेंडूत 91 धावांची मोठी भागीदारी झाली. विघ्नेश पुथूरने पडिक्कलला आऊट करून ही भागीदारी मोडली. त्याने दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. यानंतर किंग कोहलीला रजत पाटीदारची साथ मिळाली आणि दोघांनी 48 धावांची भागीदारी केली. 15 व्या षटकात हार्दिक पांड्याने किंग कोहलीला आऊट केले. त्याने 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. विराटचे या हंगामातील दुसरे अर्धशतक ठरले. दुसरीकडे, रजत पाटीदारने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करताना 32 चेंडूत 5 चौकार व 4 षटकारासह 64 धावांचे योगदान दिले. याशिवाय, जितेश शर्माने आक्रमक खेळी करताना 19 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. यामुळे आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावत 221 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईकडून हार्दिक व बोल्टने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी 20 षटकांत 5 बाद 221 (फिल सॉल्ट 4, विराट कोहली 67, पडिक्कल 37, रजत पाटीदार 32 चेंडूत 64, लिव्हिंगस्टोन 0, जितेश शर्मा 19 चेंडूत नाबाद 40, टीम डेव्हिड नाबाद 1, ट्रेंट बोल्ट व हार्दिक पंड्या प्रत्येकी दोन बळी)
मुंबई इंडियन्स 20 षटकांत 9 बाद 209 (रोहित शर्मा 17, रिकेल्टन 17, विल जॅक्स 22, सुर्यकुमार यादव 28, तिलक वर्मा 29 चेंडूत 56, हार्दिक पंड्या 42, नमन धीर 11, कृणाल पंड्या 45 धावांत 4 बळी, यश दयाल व हेजलवूड प्रत्येकी दोन बळी).