आरसीबीची लखनौवर 6 गड्यांनी मात
क्वालिफायर एकमध्ये पंजाबशी उद्या लढत जितेश शर्मा सामनावीर, कोहलीचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ लखनौ
येथे झालेल्या आयपीएल 18 मधील साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीने यजमान लखनौ सुपर जायंट्सचा 8 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. मात्र नेट रनरेटमध्ये दुसऱ्या स्थानावर त्यांना समाधान मानावे लागले. पंजाब किंग्सने सरस धावगतीच्या आधारे पहिले स्थान मिळविले. नाबाद 85 धावांची विजयी खेळी करणाऱ्या जितेश शर्माला सामनावीराचा बहुमान मिळाला.
लखनौला प्रथम फलंदाजी मिळाल्यावर कर्णधार रिषभ पंतला या स्पर्धेत प्रथमच सुर गवसला आणि त्याने नाबाद शतकी (61 चेंडूत 11 चौकार, 8 षटकारांसह 118) खेळी केली. त्याने 54 चेंडूत शतक पूर्ण केले. सलामीवीर मिचेल मार्शनेही अर्धशतकी (37 चेंडूत 4 चौकार, 5 षटकारांसह 67) खेळी केल्यामुळे लखनौने 20 षटकांत 3 बाद 227 धावा जमवित आरसीबीसमोर मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने आणखी एक अर्धशतकी खेळी केली. त्याने 30 चेंडूत 10 चौकारांसह 54 धावा फटकावल्या. त्यानंतर हंगामी कर्णधार जितेश शर्मा (33 चेंडूत नाबाद 85) व मयंक अगरवाल (23 चेंडूत नाबाद 41) यांनी अभेद्य 107 धावांची भागीदारी करीत आरसीबीला 8 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवून दिला.
या विजयानंतर आरसीबीने दुसरे स्थान घेत प्लेऑफमध्ये स्थान मिळविले. पहिल्या क्वालिफायर लढतीत त्यांचा मुकाबला अग्रस्थानावर असणाऱ्या पंजाब किंग्सशी गुरुवारी होईल तर गुजरात टायटन्सची एलिमिनेटर लढत शुक्रवारी मुंबई इंडियन्सशी होईल.
आरसीबीने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी दिली. मॅथ्यू ब्रीत्झ्के 14 धावा काढून बाद झाल्यानंतर मार्श व पंत यांनी चौफेर फटकेबाजी करीत दुसऱ्या गड्यासाठी 152 धावांची भागीदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मार्शला भुवनेश्वरने बाद करीत ही जोडी फोडली. 16 व्या षटकात तो बाद झाल्यानंतर जलद धावा करण्याच्या नादात निकोलस पूरन (10 चेंडूत 13) लवकर बाद झाला. निर्धारित 20 षटकांत लखनौने 3 बाद 227 धावा केल्या. आरसीबीतर्फे नुवान तुषारा, भुवनेश्वर कुमार, शेफर्ड यांनी एकेक बळी मिळविला.
त्यानंतर आरसीबीला कोहली व फिल सॉल्ट यांनी 34 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी सलामी दिली. सॉल्टला 30 धावांवर आकाश सिंगने बाद केले. रजत पाटीदार 7 चेंडूत 14 धावा काढून बाद झाल्यानंतर लिव्हिंगस्टोन पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. कोहली व मयंक अगरवाल यांनी 33 धावांची भर घातल्यानंतर कोहली बाद झाला. अगरवालच्या साथीने नंतर जितेश शर्माने जोरदार टोलेबाजी करीत 19 व्या षटकात आरसीबीचा विजय साकार केला. अगरवाल 23 चेंडूत 5 चौकारांसह 41 तर जितेश शर्मा 33 चेंडूत 8 चौकार, 6 षटकारांसह 85 धावांवर नाबाद राहिला. लखनौच्या ओरुरकेने 2 तर आकाश सिंग व आवेश खान यांनी एकेक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 3 बाद 227 : मार्श 37 चेंडूत 67, ब्रीत्झ्के 12 चेंडूत 14, पंत 61 चेंडूत 11 चौकार, 8 षटकारांसह नाबाद 118, पूरन 10 चेंडूत 13, समद नाबाद 1, अवांतर 14. तुषारा 1-26, भुवनेश्वर 1-46, शेफर्ड 1-51.
आरसीबी 18.4 षटकांत 4 बाद 230 : फिल सॉल्ट 19 चेंडूत 30, कोहली 30 चेंडूत 10 चौकारांसह 54, पाटीदार 7 चेंडूत 14, अगरवाल 23 चेंडूत नाबाद 41, जितेश शर्मा 33 चेंडूत 8 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 85, अवांतर 6. आकाश सिंग 1-40, ओरुरके 2-74, आवेश खान 1-32.