आरसीबी पुन्हा टेबल टॉपर, सीएसकेच्या विजयाचा घास हिसकावला
सीएसकेचा नववा पराभव : सामनावीर शेफर्डचे 14 चेंडूत अर्धशतक, विराट, बेथेलची अर्धशतके
वृत्तसंस्था/ बेंगळूर
विराट कोहली, जेकब बेथेल आणि रोमारियो शेफर्ड यांच्या अर्धशतकांनंतर तगड्या गोलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने चेन्नई सुपर किंग्जचा अवघ्या 2 धावांनी पराभव केला. आरसीबीने प्रथम खेळतना 213 धावा केल्या, ज्यानंतर चेन्नईचा संघ निर्धारित 20 षटकांत केवळ 211 धावा करु शकला. यासह, आरसीबीने आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. गुणतालिकेत आरसीबीचा संघ 16 गुणासह अव्वलस्थानी आहे. दरम्यान, 14 चेंडूत नाबाद अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या शेफर्डला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. चेन्नईच्या 17 वर्षीय आयुष म्हात्रेने या सामन्यात 94 धावांची खेळी खेळली, पण ती व्यर्थ ठरली.
प्रारंभी, आरसीबीची सुरुवात तुफानी झाली. विराट कोहली आणि बेथेल या दोघांनीही चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना 97 धावांची सलामी दिली. आरसीबीला पहिला धक्का दहाव्या षटकात बसला, जेव्हा वादळी अर्धशतक ठोकून बेथेल आऊट झाला. बेथेलने 33 चेंडूत 55 धावा केल्या. पण यानंतर, विराट कोहलीने संघाची धुरा हातात घेतली आणि 28 चेंडूत अर्धशतक झळकावले. पण सॅम करनने बाराव्या षटकात त्याची विकेट घेतली. कोहलीने 33 चेंडूत 62 धावांचे योगदान दिले. यानंतर देवदत्त पडिक्कल देखील 16 व्या षटकात आऊट झाला. त्याने 17 धावा केल्या. कर्णधार रजत पाटीदारही काही खास करू शकला नाही आणि फक्त 11 धावा करून आऊट झाला. जितेश शर्माही स्वस्तात परतला.
शेफर्डचे वेगवान अर्धशतक
रजत पाटीदार, जितेश शर्मा ही जोडी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या रोमारियो शेफर्डने धमाकेदार खेळी साकारली. शेफर्डने खलील अहमदच्या गोलंदाजीवर पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारून खळबळ उडवून दिली. यानंतरही त्याने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. चौथ्या चेंडूवर आणखी एक गगनाला भिडणारा षटकार मारला. खलील अहमदला काय करावे हे समजत नव्हते. ज्यामुळे तो लाईन लेंथही विसरला आणि नो बॉल टाकला. या चेंडूवर रोमारियो शेफर्डनेही षटकार मारला. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकारही मारला आणि अशा प्रकारे या षटकात 33 धावा केल्या. शेफर्डने 14 चेंडूत 53 धावांची तुफानी खेळी खेळली. विशेष म्हणजे, शेफर्डचे हे यंदाच्या हंगामातील जलद अर्धशतक ठरले. या आधारावर आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 214 धावांचे लक्ष्य दिले.
सीएसकेचा नववा पराभव
214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेची सुरुवात चांगली झाली. आयुष म्हात्रे आणि रशीद यांनी संघाला तुफानी सुरुवात करून दिली. पण पाचव्या षटकात 51 धावांवर असताना सीएसकेला पहिला धक्का बसला, जेव्हा रशीद 14 धावा करून बाद झाला. सहाव्या षटकात सॅम करन देखील 5 धावा काढून आऊट झाला. पण यानंतर आयुष म्हात्रेने संघाची सुत्रे हातात घेतली आणि 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याच वेळी, रवींद्र जडेजानेही त्याला साथ दिली. या दोघांनी तुफानी फटकेबाजी करत षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. दोघांमध्ये 114 धावांची भागीदारी झाली. पण 17 व्या षटकात आयुष म्हात्रेची विकेट पडली. आयुषने 94 धावांची खेळी खेळली. आयुषने त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार मारले.
शेवटच्या षटकात सीएसकेला जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता होती. पहिल्या दोन चेंडूंवर एक धाव आली, पण नंतर यश दयालने तिसऱ्या चेंडूवर धोनीला एलबीडब्ल्यू आउट केले. धोनी पुन्हा एकदा अपयशी ठरला, आणि 12 धावा करून आऊट झाला. चौथ्या चेंडूला नोबॉल होता आला, ज्यावर शिवम दुबेने षटकार मारून सामना सीएसकेच्या बाजूने आणला, परंतु शेवटच्या 2 चेंडूंमध्ये सामना परत फिरला. यश दयालने शेवटच्या 2 चेंडूत फक्त 2 धावा दिल्या, ज्यामुळे आरसीबीला 2 धावांनी रोमांचक विजय मिळाला.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी 20 षटकांत 5 बाद 213 (जेकब बेथेल 55, विराट कोहली 62, पडिक्कल 17, रजत पाटीदार 11, शेफर्ड नाबाद 53, पथिराणा 3 बळी, नूर अहमद व सॅम करन प्रत्येकी एक बळी)
चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकांत 5 बाद 211 (आयुष म्हात्रे 94, रशीद 14, रविंद्र जडेजा नाबाद 77, धोनी 12, शिवम दुबे नाबाद 8, एन्गिडी 3 बळी, कृणाल पंड्या व यश दयाल प्रत्येकी एक बळी).