बेंगळूरचा राजस्थानवर 7 धावांनी विजय
डु प्लेसिस, मॅक्सवेल यांची अर्धशतके, हर्षलचे तीन बळी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात डु प्लेसिस आणि मॅक्सवेल यांची दमदार शतके तसेच हर्षल पटेलच्या तीन बळींच्या जोरावर यजमान रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी पराभव केला. या स्पर्धेतील हा 32 वा सामना खेळवला गेला.
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून बेंगळूर संघाला प्रथम फलंदाजी दिली. बेंगळूरने 20 षटकात 9 बाद 189 धावा जमवल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 6 बाद 182 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. डावातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार कोहली बोल्टच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वी पायचित झाला. त्यानंतर बोल्टने बेंगळूरला आणखी एक धक्का देताना शाहबाज अहमदला 2 धावावर झेलबाद केले. बेंगळूर आपले दोन गडी लवकर गमावल्यानंतर डु प्लेसिस आणि मॅक्सवेल या जोडीने संघाला सुस्थितीत नेताना तिसऱ्या गड्यासाठी 11.1 षटकात 127 धावांची शतकी भागीदारी केली. डु प्लेसिसने 39 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारासह 62 धावा झळकवल्या. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा जमवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आघाडीवर आहे. डु प्लेसिसला जैस्वालने धावचित केले. मॅक्सवेलने 44 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारासह 77 धावा झोडपल्या. अश्विनने त्याला झेलबाद केले. लोमरोरने 1 चौकारासह 8, दिनेश कार्तिकने 2 चौकारासह 16, हसरंगाने 6 तसेच डेविड विलीने नाबाद 4 धावा जमवल्या. विजकुमार विशाख आणि प्रभुदेसाई यांना खाते उघडता आले नाही. बेंगळूरच्या डावामध्ये 6 षटकार आणि 18 चौकार नोंदवले गेले. राजस्थान संघातर्फे बोल्ट, संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर रविचंद्र अश्विन आणि चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. बेंगळूरचे तीन फलंदाज धावचित झाले. बेंगळूरच्या डावात 10 वाईड चेंडूसह एकूण 13 अवांतर धावा मिळाल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेंगळूर प्रमाणेच राजस्थानच्या डावालाही डळमळीत सुरुवात झाली. पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर मोहमद सिराजने सलामीच्या बटलरचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडवला. त्यानंतर जैस्वाल आणि पडीकल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 11 षटकात 98 धावांची भागीदारी केली. विलीने पडीकलला झेलबाद केले. त्याने 34 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 52 धावा जमवल्या. हर्षल पटेलने जैस्वालला कोहलीकरवी झेलबाद केले. त्याने 37 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 47 धावा जमवल्या. कर्णधार सॅमसंगने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 22 धावा जमवल्या आणि तो पटेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हेटमेयर एकेरी धाव घेण्याच्या धावचित झाला. त्याने 3 धावा केल्या. राजस्थानची स्थिती यावेळी 17.5 षटकात 5 बाद 155 अशी होती. राजस्थानला यावेळी 12 चेंडूत विजयासाठी 35 धावांची जरुरी होती. ध्रुव जुरेलने शेवटच्या दोन षटकात फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला नाही. रविचंद्रन अश्विनने 6 चेंडूत 2 चौकारासह 12 धावा जमवल्या. हर्षल पटेलने आपल्या या शेवटच्या षटकात चौथ्या चेंडूवर अश्विनला झेलबाद केले. राजस्थानला यावेळी विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची जरुरी होती. मात्र त्यांना शेवटच्या दोन चेंडूवर केवळ दोन धावा जमवता आल्याने बेंगळूर संघाने हा सामना 7 धावांनी जिंकला. जुरेलने 16 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 34 धावा जमवल्या. राजस्थानच्या डावात 11 अवांतर धावा नोंदवल्या गेल्या. त्याचप्रमाणे त्यांच्या डावात 6 षटकार आणि 18 चौकार नोंदवले गेले. बेंगळूरतर्फे हर्षल पटेल 32 धावात 3 तर मोहमद सिराज आणि विली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर 20 षटकात 9 बाद 189 (डु प्लेसिस 62, मॅक्सवेल 77, दिनेश कार्तिक 16, कोहली 0, अवांतर 13, बोल्ट 2-41, संदीप शर्मा 2-49, आर. अश्विन 1-36, चहल 1-28), राजस्थान रॉयल्स 20 षटकात 6 बाद 182(जैस्वाल 47, बटलर 0, पडीकल 52, सॅमसंग 22, हेटमेयर 3, जुरेल नाबाद 34, आर. अश्विन 12, बसिथ नाबाद 1, अवांतर 13, हर्षल पटेल 3-32, मोहमद सिराज 1-39, विली 1-26).