लो स्कोअरिंग सामन्यात बेंगळूर विजयी
लखनौचा 18 धावांनी पराभव : हॅझलवूड, कर्ण शर्माचे प्रत्येकी 2 बळी, डु प्लेसिस सामनावीर
वृत्तसंस्था/ लखनौ
लो स्कोअरिंग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने लखनौ सुपर जायंट्सचा 1 चेंडू बाकी ठेऊन 18 धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनौला दुखापतग्रस्त के. एल. राहुलची उणीव चांगलीच भासली. शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजी त्याचप्रमाणे चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या 2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील 43 व्या सामन्यात यजमान लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला 9 बाद 126 धावांवर रोखले. त्यानंतर बेंगळूर संघाने लखनौ सुपर जायंट्सला 19.5 षटकात 108 धावात गुंडाळले. या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने सुमारे 15 मिनिटे खेळ थांबविण्यात आला होता. बेंगळूरच्या डु प्लेसिसला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
पावसामुळे खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल ठरत होती तर मैदान खूपच संथ असल्याने चेंडू पळत नव्हता. याचा लाभ बेंगळूरच्या खेळाडूंनी पुरेपूर घेतला. पहिल्या षटकापासूनच लखनौने गडी गमाविण्यास प्रारंभ केला. दुखापतीमुळे के. एल. राहुल सलामीला फलंदाजी करु शकला नाही. तर तो नाईलाजास्तव शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. मोहम्मद सिराज, हॅझलवूड, कर्ण शर्मा, मॅक्सवेल, हर्षल पटेल या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. तसेच बेंगळूरच्या खेळाडूंनी दर्जेदार क्षेत्ररक्षण करुन लखनौच्या फलंदाजांना जीवदाने न दिल्याने हा सामना बेंगळूर संघाला जिंकता आला. लखनौच्या डावामध्ये के. गौतमने 13 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 23, कृणाल पंड्याने 11 चेंडूत 3 चौकारांसह 14, स्टोईनिसने 19 चेंडूत 1 षटकारासह 13, पूरनने 1 षटकारासह 9, अमित मिश्राने 30 चेंडूत 2 चौकारांसह 19 तर नवीन उल हकने 13 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. लखनौच्या डावात 4 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. बेंगळूरतर्फे हॅझलवूड आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराज, मॅक्सवेल, हसरंगा आणि हर्ष पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लखनौचे 2 फलंदाज धावचीत झाले. या सामन्यात लखनौ संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बेंगळूरचा संघाचा विराट कोहली यांच्यात या सामन्याच्या अखेरीस थोडी बाचाबाची झाली. पण मध्यस्थांनी यावर पडदा टाकला.
या सामन्यात बेंगळूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीला अनुकूल ठरत असलेल्या खेळपट्टीवर बेंगळूर संघाने आपल्या डावाला सावध पण भक्कम सुरुवात केली. कर्णधार डु प्लेसिस आणि कोहली या सलामीच्या जोडीने 9 षटकात 62 धावांची भागिदारी केली. लखनौच्या बिश्नोईने कोहलीला यष्टीरक्षक पूरनकरवी यष्टीचीत केले. त्याने 30 चेंडूत 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. सलामीची जोडी फुटल्यानंतर बेंगळूरचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. के. गौतमने रावतला 9 धावावर झेलबाद केले. तर रवी बिश्नोईने बेंगळूरला आणखी एक धक्का देताना मॅक्सवेलला 4 धावावर पायचीत केले. अमित मिश्राने सूयश प्रभूदेसाईला 6 धावावर झेलबाद केले. बेंगळूरची स्थिती 15.2 षटकात 4 बाद 93 असताना पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी खेळ थांबविला. मात्र कर्णधार डु प्लेसिस सावध फलंदाजी करत होता.
पाऊस थांबल्यानंतर पंचांनी पुढे पुन्हा खेळाला प्रारंभ केला. आणि अमित मिश्राने कर्णधार डु प्लेसिसला पंड्याकरवी झेलबाद केले. डु प्लेसिसने 40 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 44 धावा जमविल्या. यष्टीरक्षक दिनेश कार्तिक संघाची धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करीत होता. पण दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा लोमरोर नवीन ऊल हकच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 3 धावा जमविल्या. दिनेश कार्तिकला यश ठाकूरने धावचीत केले. त्याने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमविल्या. नवीन उल हकने कर्ण शर्माला 2 धावांवर बाद केले. बेंगळूरच्या डावातील शेवटचे षटक नवीन उल हकने टाकले. आणि या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने कर्ण शर्माला तर तिसऱ्या चेंडूवर मोहमद सिराजला बाद केले. हसरंगा 1 चौकारासह 8 धावावर नाबाद राहिला. बेंगळूरच्या डावामध्ये 2 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. बेंगळूरच्या केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. लखनौतर्फे नवीन ऊल हकने 30 धावात 3, रवी बिश्नोईने 21 धावात 2, अमित मिश्राने 21 धावात 2 तर गौतमने 10 धावात 1 गडी बाद केला. बेंगळूरला अवांतराच्या रुपात 2 धावा मिळाल्या.
संक्षिप्त धावफलक - रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : 20 षटकात 9 बाद 126 (कोहली 30 चेंडूत 31, डु प्लेसिस 40 चेंडूत 44, दिनेश कार्तिक 11 चेंडूत 16, रावत 9, हसरंगा नाबाद 8, प्रभूदेसाई 6, नवीन ऊल हक 3-30, बिश्नोई 2-21, अमित मिश्रा 2-21, के. गौतम 1-10).
लखनौ सुपर जायंट्स : 19.5 षटकात सर्व बाद 108 (कृणाल पंड्या 11 चेंडूत 14, स्टोईनिस 19 चेंडूत 13, के. गौतम 13 चेंडूत 23, मिश्रा 30 चेंडूत 19, नवीन उल हक 13 चेंडूत 13, अवांतर 7, हॅझलवूड, कर्ण शर्मा प्रत्येकी 2 बळी, मोहम्मद सिराज, मॅक्सवेल, हसरंगा आणि हर्षल पटेल प्रत्येकी 1 बळी).