आयसीआयसीआयला 1 कोटी, यस बँकेला 90 लाखाचा दंड
भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय : कर्ज व ग्राहक सेवेतील मानकांचे पालन न केल्याने दंड
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन खासगी बँकांना दंड ठोठावला आहे. यामध्ये पहिली बँक आहे, आयसीआयसीआय बँक. या बँकेला तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड आकारला आहे. तर दुसऱ्या बाजूला यस बँकेला आरबीआयने 90 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
कर्ज आणि ग्राहकांना देणाऱ्या सेवांशी संबंधीत मानकांचे पालन न केल्याबद्दल हा दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे. आयसीआयसीआय बँकेने 2021-22 या आर्थिक वर्षात स्वाक्षरीच्या पडताळणीशिवाय अनेक कंपन्यांना कर्ज दिले असल्याचे आरबीआयच्या तपासात समोर आले आहे. या कारणास्तव बँकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.
यस बँकेला ग्राहक सेवांशी संबंधीत मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. यस बँकेने शून्य शिल्लक खात्यांसाठी दंड आकारला होता. तसेच पार्किंग निधी व ग्राहकांचे व्यवहार मार्गी लावण्यासाठी ग्राहकांच्या नावे अंतर्गत खाती उघडली असल्याचेही समोर आले होते. यामुळे आरबीआयने हे कठोर पाऊल उचलेले असल्याचे दिसून येत आहे.
समभागात घसरण
दोन्ही बँकांचे समभाग घसरले आहेत. मंगळवारच्या सत्रात दोन्ही बँकांचे समभाग हे घसरणीत राहिले आहेत. यामध्ये दुपारी बारा वाजता आयसीआयसीआय बँकेचे समभाग हे 2.70 रुपयांसह 1,127.10 वर व्यवहार करत होते. तर यस बँकेचे समभाग हे 0.30 रुपयांसह 22.75 वर कार्यरत राहिले होते.
या अगोदर सहकारी बँकांना दंड
मार्च महिन्यात पाच सहकारी बँकांना दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयने या वर्षाच्या मार्च महिन्यात नियमांचे पालन न केल्याने 5 सहकारी बँकांवर कारवाई केली होती. या बँकांना 9.25 लाख रुपयांपर्यंतचा दंड केला होता. बँकेचे नियम आणि ग्राहक संरक्षण पालन न केल्याने हा दंड केला आहे.
या बँकांना दंड
यामध्ये हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्टॅण्डर्ड अर्बनकोऑपरेटिव्ह बँक, उत्कृष्ट सहकारी बँक, राजापालयम को ऑपरेटिव्ह अर्बन बँक आणि मंडी अर्बन को ऑपरेटिव्ह बँक यांचा समावेश राहिला आहे.