जीडीपी अंदाजात आरबीआयकडून घट
मुंबई :
भारतीय रिझर्व्ह बँकेची तीन दिवसीय पतधोरण समितीची बैठक बुधवारी संपली. यात बँकेने रेपोदरात पाव टक्का कपातीचा निर्णय घेतला. तथापि आर्थिक वर्ष 2025-26 साठी जीडीपी दर अंदाज 6.5 टक्के इतका नव्याने जाहीर पेला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरु होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गव्हर्नर संजय मल्होत्रा हे होते. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयने यासंदर्भातली माहिती दिली आहे. यापूर्वी सदरच्या आर्थिक वर्षात विकास दर 6.7 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. आता पुन्हा नव्याने आरबीआयने तो सुधारीत जाहीर केला असून जीडीपी दर 6.5 टक्के राहील असे म्हटले आहे. अमेरिकेने लादलेल्या व्यापारशुल्काच्या पार्श्वभूमीवर अनिश्चितता लक्षात घेऊन आरबीआयने नवा अंदाज वर्तवला आहे. विकास योग्य दिशेने होत असला तरी तो अपेक्षेपेक्षा कमी असल्याचेही गव्हर्नर मल्होत्रा यांनी म्हटले आहे.
महागाई दराबाबत...
रिझर्व्ह बँकेने महागाई दराबाबतही भाष्य केले आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षात महागाई दर 4 टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी महागाई दर 4.2 टक्के इतका राहण्याचे संकेत आरबीआयने व्यक्त केले होते. कृषी उत्पाददनात चांगली कामगिरी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट लक्षात घेऊन आरबीआयने महागाई दर कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.