ऊस दरासंदर्भात रयत संघाचा खानापुरात रास्ता रोको
साखर कारखान्यांनी उसाला किमान प्रतिटन 3500 रुपये दर घोषित करावा : काटामारी थांबवण्याची संघटनेची मागणी
खानापूर : साखर कारखान्यांनी उसाला किमान प्रतिटन 3500 रुपये दर घोषित करावा, त्यानंतरच कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करावा, तसेच वजनकाट्यावरील होणारी काटामारी थांबवावी, या मागणीसाठी अखिल कर्नाटक रयत संघाच्यावतीने जांबोटी सर्कल येथे सकाळी 11 ते 1 या वेळेत रास्तारोको करण्यात आला. तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आपण कारखान्याच्या संबंधितांना सूचना करू, असे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला.
अखिल कर्नाटक रयत संघाच्यावतीने उसाला प्रतिटन 3500 रुपये देण्यात यावे, तसेच कारखान्यातील काट्यावर होणारी काटेमारी थांबविण्यात यावी, उसाच्या वाहतुकीवर टोल आकारण्यात येऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी जांबोटी सर्कल येथे सोमवारी सकाळी 11 वाजता रास्तारोको करण्यात आला. यावेळी रयत संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी, अडवेश सिद्धेश्वर स्वामी, जेडीएस नेते नासीर बागवान, अशोक यमकनमर्डी, गुरुलिंगय्यास्वामी हिरेमठ, दत्ता बिडीकर, मल्लाप्पा भरनट्टी, यल्लाप्पा चन्नापूर, भाऊसाहेब पाटील, जोतिबा भेंडिगेरी यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दोन तास वाहतूक ठप्प
यावेळी किशोर मिठारी म्हणाले, शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करून उसाचे पीक घेतो. त्यासाठी प्रतिटन अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो. परंतु कारखानदार शेतकऱ्यांना उसाचा योग्य भाव देत नाहीत.उसापासून साखर, मोलॅसीस, बगॅस, विद्युत निर्मिती, इथेनॉलसह इतर उत्पादन घेतात. मात्र शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे. तसेच कारखान्यात काटामारीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी कारखान्यांनी प्रथम किमान 3500 रु. दर जाहीर करावा, कारखान्यातील वजन चोख ठेवण्यात यावे, काटामारी थांबवावी, तसेच रस्त्यावरुन वाहतूक करताना उसाच्या ट्रकला टोल आकारण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीचे निवेदनही तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सावित्री मादार यांनी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी आणि उसाला योग्य भाव देण्यात यावा, अशी मागणी केली. उपस्थित शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली होती.