वाघवडेत रवळनाथ-कलमेश्वर यात्रा उद्यापासून
बुधवारी सकाळपासून महाप्रसाद
वार्ताहर /किणये
वाघवडे गावातील जागृत रवळनाथ-कलमेश्वर यात्रा मंगळवार दि. 27 व बुधवार दि. 28 रोजी आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस यात्रा होणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गावातील पंचमंडळी व ग्रामस्थांच्या वतीने या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाघवडे गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य अशा परिसरात जागृत रवळनाथ व कलमेश्वर ही मंदिरे आहेत. सध्या रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामकाजही जोमाने सुरू आहे. दोन्ही देवस्थान जागृत असल्यामुळे पंचक्रोशीतील भक्तांची यात्रेला मोठ्या संख्येने गर्दी होते. त्यामुळे यंदाही या यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांसाठी विशेष सोय करण्यात आलेली आहे. मंगळवारपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. मंगळवारी दुपारी चार वाजता गावातील सर्व देवतांची पूजा करून रवळनाथ-कलमेश्वर मंदिराकडे सर्व ग्रामस्थ जाणार आहेत. त्या ठिकाणी गाऱ्हाणा घालून यात्रेला सुरुवात होणार आहे. बुधवारी सकाळी सहा वाजता गाऱ्हाणा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या यात्रेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.