रवींचा उत्तुंग वारसा पुढे न्यावा
श्रद्धांजली सभेत मान्यवरांचे आवाहन : गोमंतविभूषण, पद्मभूषण देण्याची शिफारस,हजारो चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली
फोंडा : रवी नाईक हे केवळ बहुजनांचे नेते नव्हते, तर समाजाच्या खालच्या स्तरावरील दबल्या अन्यायग्रस्त जनतेचा ते आवाज होते. गोव्याच्या सर्वांगिण विकासामध्ये असलेले त्यांचे बहुमुल्य योगदान आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेले कार्य चिरंतर आठवले जाणार असून रवी कार्याचे तेज कायम तळपत राहणार आहे, अशा भावना फोंडा येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आल्या. रवी नाईक यांच्या मुलांनी त्यांचा हा राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा पुढे न्यावा, आमचे पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा असल्याची हमीही उपस्थित नेत्यांनी दिली.
दिवंगत माजी मुख्यमंत्री, कृषीमंत्री व फोंड्याचे आमदार स्व. रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बेतोडा येथील सनग्रेस गार्डनमध्ये रविवारी आयोजित केलेल्या शोकसभेला मोठ्या संख्येने राज्यभरातील चाहते, हितचिंतक तसेच राजकीय नेते उपस्थित होते. रवी नाईक हे खरे लोकनायक होते. आपल्या उत्तुंग कार्यातून ते अमर राहतील. राज्य सरकारने मरणोत्तर ‘गोमंत विभूषण’ तर केंद्र सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्याची सूचनाही चाहत्यांकडून यावेळी मांडण्यात आली.
रवी नाईक यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील कार्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक सहवासातील स्मृतींना उजाळा देत आठवणी जागविण्यात आल्या. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांच्यासह आजी माजी मंत्री व आमदारांनी शोकसभेला उपस्थिती लावून श्रद्धांजली वाहिली.
मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, रवी नाईक यांनी आपली संपूर्ण हयात गोमंतकीय जनतेच्या सेवेमध्ये घालवली. माजी मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून नेहमीच सामाजिक न्यायाची बुज राखली. शिक्षणक्षेत्रातील कार्यातून सामान्य कुटुंबातील असंख्य तऊणांची स्वप्ने साकारली व त्यांचे भवितव्य घडविले. सामान्यांसाठी लढताना त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव कऊन दिली. त्यांच्या पश्चात त्यांचे कार्य आणि विचार चिरंतर राहणार आहेत. त्यांनी दाखवलेला मार्ग सदैव मार्गदर्शक ठरणार आहे.
संघर्षाकडून सन्मानाकडे पोचलेले रवी नाईक हे उत्तुंग असे नेते होते. सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या काही मोजक्याच नेत्यांपैकी ते एक होते. काँग्रेस पक्षाचा तळागाळात विस्तार करण्यामागे रवी नाईक यांचा मोठा वाटा होता. मात्र या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांच्याप्रती आदरभावना म्हणून श्रद्धांजलीपर दोन शब्द व्टिट् करता येऊ नयेत, हे मोठे दुर्दैव आहे. रवी नाईक यांना काँग्रेस पक्ष नको होता, पण काँग्रेस पक्षाला ते हवे होते कारण त्यांच्या व्यक्तित्त्वाची काँग्रेसला गरज होती. काँग्रेसने त्यांचा वापर केला. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातील विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी, नेत्यांनी रवी नाईक यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करणे, हेच रवी नाईक यांचे खरे मोठेपण होते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्याचा वारसा पुढे न्या
मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, रवी नाईक हे झुंझार नेते होते. उत्तम प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेपर्यंत त्यांनी कार्यक्षमतेचा वस्तुपाठ घालून दिला. राजकारणात त्यांनी कुणाप्रती कटुता न दाखवता नेहमीच खिलाडूवृत्ती जपली. त्यांच्या पन्नास वर्षांचा राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा त्यांच्या दोन्ही मुलांनी पुढे नेला पाहिजे. तुम्हाला जनादेश असून आपले नेहमीच सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री सुदिन ढवळीकर यांनी रवी नाईक हे दूरदृष्टीचे नेते असल्याचे सांगून त्याचे विचार आणि कार्य पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे नमूद करताना आवश्यक सहकार्याची भावनाही व्यक्त केली. शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाचा उल्लेख कऊन बहुतेकक्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला होता. आपल्या वैयक्तिक जीवनातील आठवणी सांगताना बांधकामक्षेत्रात पुढे येण्यासाठी सुऊवातीच्या काळात त्यांनी प्रोत्साहन दिल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
रवींचे राजकारण समाजाच्या उद्धारासाठी
रवी नाईक हे खऱ्याअर्थाने लोकांसाठी जगले. त्यांचे राजकारण समाजाच्या उद्धारासाठी होते, असे आमदार गोविंद गावडे म्हणाले. शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या कार्यातून सर्वसामान्य कुटुंबातील तऊणांना ज्ञानाची कवाडे खुली झाली. जात, पात, धर्म या पलिकडे जाऊन माणुसकी जपणारे असे हे महान व्यक्तिमत्त्व होते. रवी नाईक हे उत्तुंग नेते व उत्कृष्ट मार्गदर्शक होते. ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, असे माजीमंत्री महादेव नाईक यांनी सांगितले.
रवी नाईक यांच्यासारखा नेते क्वचितच जन्माला येतात. त्यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे आमदार नीलेश काब्राल म्हणाले. आमदार विरेश बोरकर म्हणाले, कुळ मुंडकारांचा हक्क आणि सामाजिक न्यायासाठी आजन्म झटलेले रवी नाईक हे खरे लोकनेते होते. त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यातच बहुजन समाजाचे हित आहे. लोकांसाठी झटलेले, लोकांची भाषा बोलणारे रवी नाईक हे सामान्यांचा आवाज होते, असे अॅङ नरेंद्र सावईकर म्हणाले. रवी नाईक यांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे तिसऱ्या जिल्ह्याचे स्वप्न साकारणे रवी नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे माजीमंत्री प्रकाश वेळीप म्हणाले.
रवी नाईक हे कुळ मुंडकारांच्या हक्कासाठी लढले तरी भाटकारांशीही त्यांचे संबंध टिकून होते. पीईएस संस्थेमार्फत फर्मागुडीत कायदा महाविद्यालय सुऊ करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. शिक्षणक्षेत्रातील त्यांची ही इच्छा पूर्ण कऊन श्रद्धांजली अर्पण करण्याची भावना अॅङ महेंद्र रायकर यांनी व्यक्त केली. रवी नाईक यांनी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा मंत्र खऱ्या अर्थाने जपला असे भाजपाचे प्रवक्ते अॅङ यतीश नाईक म्हणाले. फोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक म्हणाले, महिला सशक्तीकरणाच्या कार्यात रवी नाईक यांचा महत्त्वाचा वाटा होता. शिका, शिकवा आणि कमवा असा नारा त्यांनी महिला भगिनींना दिला होता. त्यांनी कधीच जाती धर्मामध्ये भेद केला नाही, असे फोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक म्हणाले.
पीईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास पिसुर्लेकर यांनी रवी नाईक यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याच्या स्मृतींना उजाळा दिला. अखिल गोवा पंचायत सचिव संघटनेचे गोकुळदास कुडाळकर, माजी पोलीस अधिकारी चंद्रकांत साळगावकर, डॉ. मधू घोडकिरेकर, अखिल गोवा मुस्लीम संघटनेचे उपाध्यक्ष सलीम काझी, हरवळे श्री ऊद्रेश्वर देवस्थानचे अध्यक्ष यशवंत माडकर, मिलिंद म्हाडगूत, महेंद्र खांडेपारकर, नरेंद्र तारी, मनोहर भिंगी, डॉ. संतोष उसगावकर, अॅङ नेल्सन सुवारीस यांनी, फोंड्याचे नगराध्यक्ष आनंद नाईक यांनी आदींनी प्रातिनिधीक व वैयक्तिकरित्या आपल्या भावना व्यक्त केल्या. शोकसभेची सुऊवात सर्वधर्मीय प्रार्थनेने झाली व संगीतकार अजय नाईक यांनी प्रार्थनागीत सादर केले. त्यानंतर पुत्र रवी नाईक आणि रितेश नाईक यांनी आदरांजली वाहिली. शेवटी उपस्थितांपैकी हजारो चाहत्यांनी रवी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून श्रद्धांजली वाहिली.
सर्वांचे प्रेम आणि सहकार्याने वडिलांचे कार्य पुढे नेऊ : रितेश नाईक
रवी नाईक यांचे पुत्र नगरसेवक रितेश नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, वडिलांच्या निधनामुळे डोक्यावरील आभाळ हरवल्याची भावना व्यक्त केली. या कठिण प्रसंगी राज्यभरातून असंख्य चाहते व हितचिंतकांनी जो धीर आणि आधार दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांचे प्रेम, माया आणि आपुलकीने अंत:करण भऊन आले. हे सांगताना त्यांना अश्रु अनावर झाले. रवी नाईक यांचे कार्य आणि विचार पुढे घेऊन जाताना हेच प्रेम आणि सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.