रविंद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश
वृत्तसंस्था/गांधीनगर
भारताचा विश्वविख्यात अष्टपैलू क्रिकेट खेळाडू रविंद्र जडेजा याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर येथे त्याने गुरुवारी अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. त्याची पत्नी रिवाबाने त्याच्या पक्षप्रवेशाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. रिवाबा या स्वत: गुजरातमधील जामनगर विधानसभेच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. आता रविंद्र जडेजाही या पक्षाचा सदस्य झालेला आहे. त्याची पत्नी रिवाबा यांनी 2019 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना जामनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मोठ्या बहुमताने त्या निवडून आल्या. तेव्हापासूनच रविंद्र जडेजाच्या भारतीय जनता पक्षप्रवेशाची चर्चा होत होती.
क्रिकेटमध्ये अनेक विक्रम
रविंद्र जडेजा याच्या नावे क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदले गेले आहेत. 2024 ची टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धा जिंकलेल्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. या ऐतिहासिक विजयानंतर त्याने टी-20 मधून आपली निवृत्ती घोषित केली होती. त्याचे वय 35 वर्षांचे आहे. त्याने आतापर्यंत 72 कसोटी सामन्यांमध्ये 36.10 सरासरीने 3 हजार 36 धावा काढल्या असून 294 बळी मिळविले आहेत. त्याने 50 षटकांच्या एकदिवशीय 197 सामन्यांमध्ये 32.40 सरासरीने 2 हजार 756 धावा काढल्या असून 189 बळी घेतले आहेत. तर 74 टी-20 सामन्यांमध्ये 21.40 च्या सरासरीने 515 धावा केल्या असून 54 बळी घेतले आहेत.