वायंगणी उपसरपंचपदी रवींद्र धोंड यांची बिनविरोध निवड
वेंगुर्ले(वार्ताहर)-
वायंगणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार रवींद्र धोंड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
वायंगणी ग्रामपंचायत कार्यालय येथे आज शुक्रवारी घेण्यात आलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी रवींद्र धोंड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविस्तार अधिकारी जी. आर. धुरी यांनी काम पाहिले.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर, ग्रामपंचायत सदस्य विद्या कांबळी, दिपाली नांदोस्कर, अनंत केळजी, रवींद्र धोंड, महेश मुणनकर, अनंत मठकर, सविता परब, विद्या गोवेकर, साक्षी धोंड आदी ग्रामपंचायत पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तसेच यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश परब, वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हा प्रमुख तथा वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम, उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर आदींसह वायंगणी गावातील ग्रामस्थ नवनिर्वाचित उपसरपंच रवींद्र धोंड यांचे तसेच सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर यांचे पुष्पहाराने अभिनंदन केले
यावेळी उध्दव ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी, 'वायंगणी गाव हा परीसर पर्यटनाने विकासासाठी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी कोणतेही राजकारण न करता राज्याच्या सत्तास्थानातील पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विकास जरूर करा. आमच्या पक्षाच्या माध्यमातून या भागातील विकास कामांना निधी मिळवून दिला जाईल असे स्पष्ट केले.
यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब, उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर यांनी आपण सरपंच पदावर काम केलेले आहे. ज्या नागरिकांनी आपणास लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहे. त्यांना आपल्या भागात जी विकास कामे अपेक्षित आहेत. ती पूर्ण करा. विकास कामात राजकारण आणू नका. या गावच्या विकास कामांसाठी आमच्या पक्षाच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत यांनी निधी देऊन सहकार्य केलेलेच आहे, यापुढेही हे सहकार्य राहील असे स्पष्ट केले.