रविचंद्रन स्मरणचे नाबाद शतक
वृत्तसंस्था/ हुबळी
रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ब गटातील येथे रविवारपासून सुरु झालेल्या सामन्यात यजमान कर्नाटकाने चंदीगडविरुद्ध पहिल्या डावात 5 बाद 294 धावा जमविल्या. रविचंद्रन स्मरणने नाबाद शतक (110) तर करुण नायरचे शतक केवळ 5 धावांनी हुकले.
या सामन्यात कर्नाटकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे 3 फलंदाज केवळ 64 धावांत बाद झाले. त्यांनतर करुण नायर व स्मरण यांनी चौथ्या गड्यासाठी 119 धावांची शतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. कर्णधार मयांक अगरवाल 9 धावावर, सलामीचा अनिश 2 धावावर तर श्रीजीत 17 धावांवर बाद झाले. करुण नायरने 164 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 95 धावा जमविल्या. अभिनव मनोहरने 11 धावा केल्या. स्मरण आणि श्रेयस गोपाल यांनी 6 व्या गड्यासाठी अभेद्य 84 धावांची भागिदारी केली. स्मरण 1 षटकार आणि 11 चौकारांसह 110 तर श्रेयस गोपाल 4 चौकारांसह 38 धावांवर खेळत आहे. चंदीगडतर्फे बिर्लाने 2 तर जगजित सिंग, राज बावा आणि तरणप्रीत सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - कर्नाटक प. डाव 5 बाद 294 (रविचंद्रन स्मरण खेळत आहे 110, करुण नायर 95, श्रेयस गोपाल खेळत आहे 38, बिर्ला 2-85).