रविचंद्रन अश्विनमुळे नवा वाद
वृत्तसंस्था / चेन्नई
किव्रेटमधून नुकताच निवृत्त झालेला रविचंद्रन अश्विन या भारताच्या नावाजलेल्या माजी खेळाडूने हिंदी भाषेविषयी नवा वाद निर्माण केला आहे. तामिळनाडूत एका विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात भाग घेताना त्याने हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नसून ती केवळ अधिकृत भाषा आहे, असे मत व्यक्त केले. त्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले असून सोशल मिडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.
तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महाविद्यालयाच्या पदवी विद्यार्थ्यांच्या काय कार्यक्रमात त्याने हे विधान केले. स्वत: अश्विन हा तामिळनाडूचाच आहे. त्याला या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते. त्याने या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. या सभागृहात इंग्रजी जाणणारे विद्यार्थी किती आहेत, असा प्रश्न त्याने विचारला होता. त्याला बऱ्याच विद्यार्थ्यांनी होकार दिला. नंतर त्याने तामिळ जाणणारे विद्यार्थी किती आहेत, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यालाही मोठा होकार मिळाला. हिंदी जाणणारे विद्यार्थी किती आहेत, या प्रश्नाला मात्र, एकही होकार मिळाला नाही. त्यानंतर हिंदी भारताची राष्ट्रभाषा नसून ती केवळ अधिकृत भाषा आहे, अशी टिप्पणी त्याने केली.
वाद जुनाच
अश्विन याने केलेले विधान आणि त्यावरुन निर्माण झालेला वाद नवा नाही. तो कैक दशकांपासूनचा आहे. तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेला राजकीय विरोध मोठ्या प्रमाणात केला जातो. हिंदी भाषा विरोध हा तेथील द्रविडी राजकारणाचा महत्वाचा मुद्दा आहे. त्या राज्यात हिंदी जाणणाऱ्यांची संख्याही अत्यल्प आहे. उत्तर विरुद्ध दक्षिण अशी राजकीय फाटाफूट होण्यासही हा वाद कारणीभूत मानला जातो. हिंदी भाषा तामिळनाडूवर थोपविली जाते, असा आरोप तेथे नेहमी केला जातो.
खेळाडूने वादात पडू नये...
तामिळनाडूतील हिंदी विरोध आणि त्यावरुन निर्माण झालेल्या वादात अश्विनसारख्या भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूने पडावे काय, असा प्रश्न त्याच्या विधानावरुन निर्माण झाला असून त्यावर सोशल मिडियावर अनेक मतमतांतरे व्यक्त केली जात आहे. अश्विनकडून ही अपेक्षा नव्हती, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे, तर काहीजण त्याच्या समर्थनार्थही उतरले आहेत.
घटनात्मक स्थिती
भारताच्या राज्यघटनेत हिंदी भाषा भारताची अधिकृत भाषा असल्याला उल्लेख आहे. ती भारताची राष्ट्रभाषा असल्याचे घटनेत स्पष्ट करण्यात आलेले नाही. देशभरात 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. घटना निर्माण करणाऱ्या घटनासमितीने हिंदी ही भारताच्या केंद्र सरकारची अधिकृत भाषा आहे, असे स्पष्ट केले होते. या संदर्भात घटनात्मक स्थितीही हीच आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात हिंदी ही मातृभाषा असणाऱ्यांची संख्या 43.63 टक्के इतकी आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालीन यांनी हिंदीची सक्ती केली जात असल्याचा आरोप केंद्रातील भारतीय जनता पक्षप्रणित सरकारवर केला होता. 2019 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक देश एक भाषा’ अशी घोषणा केली होती. त्यावेळीही तामिळनाडूच्या सरकारने या घोषणेला विरोध केला होता.