साताऱ्यात पोलीस बंदोबस्तात रेव्ह पार्टी
सातारा :
जगविख्यात कास पठाराला लागलेले बदनामीचे ग्रहण अधिक गडद होतेय. येथील एका हॉटेलमध्ये रविवारची रात्र नंगानाच करण्यात गेली. दारूसह अंमली पदार्थांचे सेवन करत बारबाला नाचवल्या. साताऱ्यातील कुविख्यात मच्छीबाज गुंडाचा हा धुडगुस गाड्या फोडणे, डोकी फोडणे, हत्याराने वार करणे यापर्यंत सुरू होता. हा सगळा घटनाक्रम सहाय्यक पोलीस निरीक्षकाला माहित असूनही याची नोंद न झाल्यामुळे या नंगानाच रेव्ह पार्टीला पोलिसांचा बंदोबस्त होता की काय? अशी शंका आहे.
निसर्गसंपन्न यवतेश्वर घाट ते कास पठार हा जणू रेडलाईट एरिया झालाय की काय? अशी शंका येत आहे. रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का भोगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांना ही रेव्ह पार्टी अदा केली.
‘तरुण भारत’च्या हाती इत्थंभुत पुरावे
सोमवारी पहाटेपर्यंत चाललेल्या या रेव्ह पार्टीचे इत्थंभूत पुरावे तरुण भारतच्या हाती आहेत. या पार्टीत दारूसह अंमली पदार्थांचा वापर केल्याचे समजते आहे. गुंडासह 20 सहकारी आणि 10 बारबाला असा लवाजमा पहाटेपर्यंत घुमत होता.
हॉटेलवाल्याची ‘मल्हार’ वारी निघणार का?
जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठार परिसरात एक हॉटेलवाला सरेआम नंगानाच घडवून आणतो. हॉटेलमध्ये मध्यरात्री लागलेला डीजे काही किलोमीटर अंतरापर्यंत कानठळ्या वाजवत राहतो. आणि हा प्रकार या हॉटेलमध्ये पहिलाच नाही, असेही ग्रामस्थ छातीठोकपणे सांगतात. असल्या गुंड प्रवृत्तीच्या हॉटेलवाल्यांमुळे कास परिसर बदनाम होतोय. यामुळे मेढा पोलिसांनी अशा प्रवृत्तीच्या हॉटेल मालकाची ‘मल्हारवारी’ काढलीच पाहिजे. याचबरोबर या गंभीर गुन्ह्यात हॉटेल मालकाला (कातडी बचावण्यासाठी मॅनेजरला नव्हे), अशीही मागणी आहे.
गाड्या फोडल्या-डोकी फोडली, कोयत्याने वार
ही रेव्ह पार्टी सुरू असतानाच अचानक काही प्रकार घडला. आणि त्याचे रुपांतर कोयते, तलवारी नाचवण्यात गेले. यामध्ये काही गाड्या फोडण्यात आल्या. तर तलवार कोयत्याने हाणामारी होवून काहींची डोकी फुटली तर काहींच्यावर कोयत्याने वार झाले. याचेही पुरावे तरुण भारतकडे उपलब्ध झाले आहेत.
अंमली पदार्थ आणि दारू पिवून झालेल्या भांडणात दारूच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला. बाटल्या डोक्यात फोडण्याबरोबरच बाटल्यांची फेकाफेकी झाल्यामुळे हॉटेलच्या काचाही फुटल्या आहेत. या रेव्ह पार्टीचा आयोजक असणाऱ्या मच्छीबाज गुंडांनेच सोमवारी दुपारी झालेल्या नुकसानीची भरपाई दिल्याचे समजते. हॉटेलच्या फुटलेल्या काचांचे नुकसान भरुन देण्यात आले आहे.
तर कास पठारचे पटाया होईल
परवाच एका खासगी बंगल्यात एक रिल स्टारसह काहींना वेश्या व्यवसाय करताना पकडण्यात आले. यवतेश्वर घाट तर नशेली अड्डा झाला आहे. आणि कास पठार परिसरातील हॉटेलवर असा सरेआम नंगानाच आणि सरेआम रेव्ह पार्ट्या होत असतील तर भविष्यात कास पठारचं पटाया होईल. दरम्यान, इतका भयानक प्रकार होत असताना साताऱ्यातील तथाकथित सामाजिक कार्यकर्ते कुठे गेले हाही प्रश्न अनुत्तरीत आहे.
समीर शेख यांच्याकडून कठोर चौकशीचे आदेश
घडलेल्या प्रकाराची बातमी करण्यापूर्वीच ‘तरुण भारतने साऱ्या प्रकाराची हकीकत पोलीस अधीक्षक समीर शेख यांना सांगितली. त्यावर या प्रकाराचे गांभिर्य ओळखून या प्रकाराच्या कठोर चौकशीचे आदेश दिले. असा प्रकार घडला असेल तर तो साताऱ्याच्या व समाजजीवनाच्या लौकिकाला बाधा आणणारा आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी पोलीस उपअधीक्षक पदावरील उच्च अधिकाऱ्याकडुन केली जाईल, असेही त्यांनी ‘तरुण भारत’ला सांगितले.
बारबाला पुण्याच्या की पनवेलच्या
एम. एच. 12 पासिंग असलेल्या दोन आर्टिगा गाड्यांमधुन आलेल्या 10 बारबाला या पुण्याच्या की पनवेलच्या यावरुनही साताऱ्यात गॉसिपिंग सुरू आहे. जखमी झालेल्यांना साताऱ्यातील एका हॉस्पिटलने ‘आधार’ दिला. आणि जखमी न झालेल्या बिचाऱ्या ‘निराधार’ मद्यपींनी आख्खी रात्र रंगीन केली. त्यामुळे गुन्हा दाखल करताना सहभागी असलेले 20 साथीदार, 10 बारबाला आणि हॉटेल मालकावरही गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. आता या प्रकरणात मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांचे कसब दिसून येईल.