Rautwadi And Kalammawadi: हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांचा हिसका, धबधबा परिसरात दंडात्मक कारवाई
धरणांवर हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई, 43 हजारांची दंड वसूली
By : महेश तिरवडे
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला राऊतवाडी धबधबा आणि काळमवाडी धरण परिसरात पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी थांबवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या दोन्ही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरण परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या 55 दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईतून एकूण 33, 000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या एका व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली असून, त्याला 10,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
गेल्या काही काळापासून राऊतवाडी आणि काळमावाडी धरण ही पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणे बनली आहेत. मात्र, काही पर्यटक येथे हुल्लडबाजी करत असल्याने स्थानिकांना आणि प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
यापुढेही धरण परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पाऊले उचलली जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पर्यटकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.