युपीएससी परीक्षेत रत्नागिरीचे तिघे
प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्हयातील तीघांनी यश संपादन करत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिह्याचा झेडां अटकेपार रोवला आहे. या परीक्षेत प्रियवंदा म्हाडदळकरने देशात तेरावी रँक तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनिय यश मिळवले. मूळचा मंडणगड तालुक्यातील माटवणचा रहिवासी व सध्या तालुक्यातील नातूनगर येथे वास्तव्यास असलेला, ज्ञानदीपचा माजी विद्यार्थी अक्षय महाडिक देशात 212 व्या रँकसह उत्तीर्ण झाला आहे. रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात राहणाऱया चेतन नितीन पंदेरे याने देशात 416 वे रँकिंग प्राप्त केले आहे.
महाराष्ट्रात प्रथम आलेली प्रियवंदा म्हाडदळकर ही कोकण विकास महामंडळाचे निवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक अशोक म्हाडदळकर यांची ती कन्या आहे. चिपळूण शहरातील विरेश्वर कॉलनीत त्यांचे निवासस्थान असले तरी ते सध्या मुंबईलाच रहातात. प्रियवंदाच्या या उल्लेखनिय यशाने जिल्हय़ासह संपूर्ण कोकणवासियांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. निकालानंतर अनेकांनी प्रियवंदा आणि म्हाडदळकर कुटुंबियांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
देशात 212 व्या रँकसह उत्तीर्ण झालेला अक्षय महाडिक याने भडगाव येथील ज्ञानदीप विद्यामंदिरमधून 10 वी बोर्डाच्या परीक्षेत तालुक्यात पहिला येण्याचा मान पटकावला होता. 12वी विज्ञान शाखेतून त्याने तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला होता. विविध शिष्यवृत्ती परीक्षांतही त्याने चांगले यश प्राप्त केले होते. मुंबई -नेरुळ येथील महाविद्यालयातून त्याने बी.टेक. पदवी प्राप्त केली होती.
देशात 416 वे रँकिंग प्राप्त करत रत्नागिरीच्या चेतन नितीन पंदेरे यानेही या परीक्षेत बाजी मारली आहे. चेतनने मुंबई आयसीटी कॉलेजमधून 2018 मध्ये केमिकल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला भारत पेट्रोलियममध्ये चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. पण त्याठिकाणी त्याचे मन रुळले नाही. आपले प्रशासकीय सेवेतच करियर करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भक्कम पगाराची नोकरी न करता त्याने युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. चेतनला 2019 साली पूर्व परीक्षेत अपयश आले होते. त्या अपयशाने खचून न जाता त्यांने पुन्हा जिद्दीने तयारी सुरु केली होती. कोरोनामुळे पुस्तके गुंडाळून घरी देखील त्याला यावे लागले होते. परंतु 2021 मध्ये दुसऱया प्रयत्नात त्याने हे यश संपादित केले आहे.