बुद्धिबळाच्या पटावरचा रत्नागिरीचा उदयोन्मुख ‘ग्रँडमास्टर‘ आर्यन धुळप!
रत्नागिरीच्या सुपुत्राची स्पर्धांमध्ये पदकांकडे धाव!
- त. भा. प्रतिनिधी, रत्नागिरी
बुद्धीच्या या खेळात बाजी मारण्यासाठी लागते ती केवळ एकाग्रता आणि अचूक ‘मूव्ह‘. हेच तंत्र आत्मसात करून रत्नागिरीचा युवा बुद्धिबळपटू आर्यन अभय धुळप सध्या यशाची नवनवीन शिखरे सर करत आहे. मैदानावरील खेळांइतकीच चुरस जेव्हा 64 घरांच्या पटावर रंगते, तेव्हा आर्यनचे ‘शह-काटशह‘ भल्याभल्यांना विचार करायला भाग पाडतात.
यशाचा ‘अश्व‘ चौखूर
नुकत्याच कुडाळ येथे संपन्न झालेल्या ‘खासदार चषक‘ खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आर्यनने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. देशभरातील आणि कोकणातील कसलेल्या खेळाडूंमध्ये आर्यनने 7 फ्रेयांमध्ये 5 गुण मिळवत मानाचे पारितोषिक आपल्या नावे केले. केवळ स्थानिक स्पर्धाच नव्हे, तर सांगली येथे झालेल्या खुल्या ‘फिडे रॅपिड रेटिंग‘ स्पर्धेतही रत्नागिरी जिह्याचा झेंडा फडकवत त्याने द्वितीय क्रमांक पटकावला. या विजयाने केवळ आर्यनच्या आत्मविश्वासात भर पडली नाही, तर रत्नागिरीच्या बुद्धिबळ परंपरेला नवी उभारी दिली आहे.
फिडे मानांकनात मोठी झेप आणि जिद्द
आर्यनच्या प्रगतीचा आलेख त्याच्या फिडे (इघ्अ) रेटिंगवरून स्पष्ट होतो. रत्नागिरीतील कै. रामचंद्र सप्रे स्मृती राज्य अमॅच्युअर अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 1429 इतके क्लासिकल फिडे मानांकन प्राप्त केले आहे. बुद्धिबळात रेटिंग वाढवणे हे अत्यंत कष्टाचे काम असते, मात्र आर्यनने ते आपल्या मेहनतीने साध्य केले आहे. एका उदयोन्मुख खेळाडूसाठी इतके गुणांकन मिळवणे ही भविष्यातील मोठ्या यशाची नांदी मानली जात आहे.
बोर्ड परीक्षेसोबत खेळाचाही केला सराव
आर्यनच्या यशाची सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे त्याचा ‘टाइम मॅनेजमेंट‘. नुकतीच त्याने इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा दिली आहे. परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे ओझे असते, पण आर्यनने हे ओझे न मानता अभ्यासाचा गाडा सांभाळत बुद्धिबळाचा सरावही तितक्याच ताकदीने सुरू ठेवला. ‘श्रीमंत पेशवाई गणपती चषक 2026‘ असो किंवा ‘आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त‘ झालेली स्पर्धा, तिथे त्याने बाजी मारली. अशाप्रकारे आर्यनने प्रत्येक ठिकाणी आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे.
खेळातील बारकावे सुधारण्यावर देतोय भर
कौटुंबिक पाठबळ आणि प्रशिक्षकांचे अचूक मार्गदर्शन यांच्या जोरावर आर्यन सध्या आपल्या खेळातील बारकावे सुधारण्यावर भर देत आहे. बुद्धिबळासारख्या संयम लागण्राया खेळात आर्यनने मिळवलेली ही झेप रत्नागिरीच्या क्रीडा विश्वासाठी भूषणावह आहे. आर्यन धुळप याच्या या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आगामी काळात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास रत्नागिरीतील क्रीडा प्रेमींकडून व्यक्त केला जात आहे.