पाण्यात बुडवून रत्नागिरीच्या अमायराचा गोव्यात खून
फेंड़ा, रत्नागिरी :
कसयले, तिस्क-उसगांव येथे बेपत्ता झालेल्या 4 वर्षीय अमायरा या चिमुकल्या मुलीचे डोके पाण्याने भरलेल्या बाथ टबमध्ये बुडवून निर्घृण खून केल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले आहे. निर्घृण हत्येनंतर घराजवळ मृतदेह दफन केल्याप्रकरणी संशयित दांपत्याची शुक्रवारी फोंडा येथील प्रथम वर्ग न्यायालयाने 6 दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. अमायरा मूळ रत्नागिरीतील रहिवासी असल्याने तिच्या खुनाच्या प्रकारामुळे रत्नागिरीतही संताप व्यक्त केला जात आहे.
अमायरा या 4 वर्षीय निष्पाप मुलीच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित म्हणून अवघ्या 50 मिटर अंतरावरील शेजारच्या पती-पत्नी बाबासाहेब उर्फ पप्पू अलहड (52) व पूजा अलहड (40, मूळ रा. महाराष्ट्र सध्या रा. कसयले) यांना फोंडा पोलिसांनी घटनेच्या दिवशीच ताब्यात घेतले होते. अमायरा ही बुधवार दुपारनंतर आपल्या आजीच्या घरातून बेपत्ता झाली होती. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी छडा लावताना घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज महत्वाचे ठरले होते. खुनाच्या घटनेचा अवघ्या 24 तासात छडा लावून फोंडा पोलीस टीमने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
- बाथ टबमध्ये बुडवून केला खून
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पूजा आणि मयत मुलीची आई यांच्यातील भांडणातून निष्पाप मुलीचा खून झाल्याचे सांगितले. अंधश्रद्धेतून निष्पाप मुलीचा बळी गेल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. शवचिकित्सा अहवालातून व फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काढलेल्या निष्कर्षानुसार संशयित पती-पत्नीने 4 वर्षीय मुलीचे डोके पाण्याने भरलेल्या बाथ टबमध्ये बुडवून खून केला. पाण्यात बुडवण्याच्या काही चिन्हे असलेल्या मुलाचे डोके, नाक आणि तोंड एकाच वेळी दाबल्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास हे मृत्यूचे कारण असल्याचा पोलिसांनी दुजोरा दिला.
- अपत्यावरून हिणवले गेल्याने खून
4 वर्षीय मुलीची आई आणि संशयित पूजा अलहड यांच्यातील भांडण आणि जोरदार वादातून चिमुकल्याचा बळी गेल्याचे संशयिताच्या जबानीतून नोंद करण्यात आली आहे. मृत मुलाची आई आणि संशयित पूजा यांचे भांडण होत असे. आपल्याला अवघ्या 19 वर्षात 2 अपत्ये व 25 वर्षापासून एकही मूल पदरात नाही, यावरून हिणवत पूजाला मस्करी करून हिणवत असे. तो राग पूजाच्या मनात घर करून गेला होता. हा राग तिच्या मनात खदखदत होता. त्या रागाच्या भरात ती अनेकवेळा अद्दल घडविण्यासाठी संधी शोधत होती. घटनेच्या दिवशी नेमकी संधी साधून संशयित पूजाने 4 वर्षीय मुलीला मिठाई देऊन घरात नेले आणि तिची हत्या केली. याचा थांगपत्ता कुणाला लागणार नाही, असा तिचा समज झाला होता. लागलीच मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर शोधाशोध सुरू झाल्यामुळे मृतदेह गायब करणे जमले नाही. त्यासाठी घराच्या बाजूला खोदून तिला दफन करण्यात आले. त्यावर बाथ टबचे आच्छादन घालून काहीच न झाल्याचा आव आणला. मात्र सीसीटीव्हीने घात केल्याने प्रकरण उघड्यावर आले. या प्रकरणी घटनास्थळी भेट दिलेल्या फॉरेन्सिक टीमने अंधश्रद्धेने प्रोत्साहन देणारे क़ृत्याची कोणतीच चिन्हे नसल्याचा उजाळा दिला.
- संशयितांना फाशीची शिक्षा द्या : पीडित मातेची मागणी
मयत मुलीच्या पीडित आईने दोघांही संशयिताना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच येथील ग्रामस्थांनी असे अमानवी कृत्य करणाऱ्या दाम्पत्यांना कायमचा तुरुंगवास द्यावा, असे बोलून दाखविले. या दाम्पत्यापासून येथील लहान मुलांना धोका असल्याने संशयिताना येथून हद्दपार करणार, असा पवित्रा घेतलेला आहे. संशयित बाबासाहेब याचे संजीवनी साखर कारखाना येथील कॉलनीत लहानपण गेले आहे. उसगांव भागात तो पप्पू या नावाने परिचित आहे. मागील 10 वर्षापासून तो कसयले येथे स्वत:चे घर बांधून राहत असे. पदराला पोटचे मूल नसल्याने दाम्पत्य निराश होते. देवधर्म करूनही कोणतीच फलप्राप्ती नसल्याने श्वानांना नियमित पोट भरून अन्न पुरवून भुतदया पाळीत सेवा करीत जीवन व्यथित करीत होती. मात्र क्षुल्लक कारणाच्या भांडणावरून निष्पाप जीव गेल्याने येथील शेजाऱ्यांनाही धक्का बसलेला आहे.
दरम्यान शुक्रवारी शोकाकूल वातावरणात निष्पाप मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत मुलीच्या वडिलांचीही जबानी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. या घटनेचा छडा लावण्यात फोंडा पोलिसांच्या टीममधील उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक संदीप निंबाळकर, योगेश गावकर, बन्सल नाईक, सुशांत गावकर, हवालदार केदारनाथ जल्मी, कॉन्स्टेबल शांतीलाल गावकर, शिवाजी चव्हाण, साईश मांद्रेकर यांच्या टीमने ही कौतुकास्पद कामगिरी पार पाडली.