Ratnagiri News : एसटी-रुग्णवाहिका अपघातानंतर तब्बल दोन तास वाहतूक कोंडी
11:38 AM Jun 07, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
रत्नागिरी: शहरातील आरोग्य मंदिर परिसरात शनिवारी सायंकाळी एसटी बस आणि रुग्णवाहिका यांच्यात अपघात झाला. या अपघातामुळे मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून वाहनांचे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास एक रुग्णवाहिका शिवाजीनगरकडून आरोग्य मंदिर मार्गे मजगावच्या दिशेने जात होती. त्याचवेळी रत्नागिरीतून साळवी स्टॉपकडे जाणारी बोरिवली-रत्नागिरी एसटी बस आणि रुग्णवाहिका आरोग्य मंदिर चौकात समोरासमोर आल्या आणि दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.
दोन्ही गाड्यांचे नुकसान
जोरदार धडकेने रुग्णवाहिकेचे मागील चाक फुटले तर एसटी बसच्या समोरील काचेचा चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अपघातात गजबजलेल्या मुख्य मार्गावर सुमारे २ तास वाहतूक कोंडी सुदैवाने कुणीही जखमी नाही, अनर्थ टळला दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने रुग्णवाहिकेतील व्यक्ती आणि बसमधील प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही.
प्रवाशांचे हाल
या अपघातानंतर हा मुख्य मार्ग वाहनांच्या रांगांमुळे काही वेळातच ठप्प झाला. शहरातील अत्यंत गजबजलेल्या या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ही माहिती मिळताच शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
क्रेनने बाजूला केली वाहने
पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली आणि तब्बल दोन तासांच्या परिश्रमानंतर वाहतूक पूर्ववत केली. सायंकाळच्या वेळी निर्माण झालेल्या या कोंडीमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
Advertisement
Advertisement