रत्नागिरीच्या धावपटूंचा दक्षिण आफ्रिकेत झेंडा
रत्नागिरी :
शहरातील प्रसाद देवस्थळी आणि चिपळूणच्या डॉ. तेजानंद गणपत्ये व मुळचे खेडमधील सध्या ठाणे स्थित सुरेश वेलणकर यांनी दिव्यांगत्वावर मात करत जागतिक स्तरावर आपल्या यशाची मोहर उमटवली आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेमधील जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेतील पिटर्समारीबर्ग ते डर्बन हे सुमारे 90 किलोमीटरचे अंतर 11 तास 30 मिनिटांत पूर्ण करत कोकणचा झेंडा उंचावला.
या यशामुळे रत्नागिरी व कोकणातील क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडला आहे. कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वांत जुनी आणि प्रतिष्ठेची अल्ट्रा मॅरेथॉन मानली जाते. यावर्षी स्पर्धेचे 98वे वर्ष होते. पिटर्समारीबर्ग ते डर्बन हे सुमारे 90 किलोमीटरचे अंतर 12 तासांत पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते. तापमानात 5 अंश ते 22 अंश सेल्सिअस इतका फरक, चढउतार आणि अनेक अडथळ्यांचा सामना करत गणपत्ये व देवस्थळी यांनी ही शर्यत 11 तास 30 मिनिटांत पूर्ण केली.
देवस्थळी (11 तास 38 मिनीटे, 49 सेकंद) आणि डॉ. गणपत्ये (11 तास 24 मिनीटे 41 सेकंद) व वेलणकर (9 तास 41 मिनीटे 08 सेकंद) यांनी स्पर्धा पूर्ण करून पदक मिळवले कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजक प्रसाद देवस्थळी सक्रिय धावपटू असून, देशभरातील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतात. कॉम्रेड्स मॅरेथॉन ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन होती. वैयक्तिक कामगिरी हा विषय नव्हता. पण अर्थातच मोठी मॅरेथॉन पूर्ण केल्याचे समाधान आहे. वैयक्तिक कामगिरीपेक्षा कोकणवासियांना ही मोठी स्पर्धा कशी असते, हे समजावे यासाठी प्रयत्न केल्याचे त्यानी सांगितले.
धामापूरतर्फे संगमेश्वर गावचे सुपुत्र असलेल्या देवस्थळी यांचे 13 जून रोजी रत्नागिरीत आगमन होणार असून, त्यांचे नागरी सत्कारासह जंगी स्वागत होणार आहे. सुवर्णसूर्य फाऊंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन टीम आणि शेकडो धावपटूंनी स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे.
चिपळूणचे डॉ. गणपत्ये हे या शर्यतीत सहभागी झालेले दुसरे कोकणातील यशस्वी सायकल व धावपटू. त्यांनी याआधी लोहपुऊष किताब आणि सायकलिंगमध्ये एस. आर. किताब मिळवले आहेत. शेवटच्या 30 किलोमीटरमध्ये टाकलेले प्रत्येक पाऊल हे सहनशक्तीची परीक्षा घेणारे होते. प्रसाद आणि आपण ही स्पर्धा पूर्ण करणारे रत्नागिरी जिह्यातील पहिले धावपटू ठरलो, याबद्दल आनंद असल्याचे ते म्हणाले.