For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri Rain: जिह्यातील अनेक गावे अंधारात, वीजपुरवठा पूर्णपणे खंडित

03:17 PM May 11, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri rain  जिह्यातील अनेक गावे अंधारात  वीजपुरवठा पूर्णपणे खंडित
Advertisement

जिल्ह्यात करोडोंची वित्तहानी, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

Advertisement

रत्नागिरी : जिह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला. ज्याचा मोठा फटका महावितरणच्या पायाभूत सुविधांना बसला आहे. वादळामुळे अनेक गावातील 235 वीजखांब मोडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत अनेक गावे अंधारात होती.

दरम्यान, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.प्राथमिक अंदाजानुसार, या वादळामुळे महावितरणचे सुमारे 80 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले.

Advertisement

सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले. या वादळाचा जोर इतका प्रचंड होता की, जिह्याच्या विविध भागांत महावितरणच्या उच्चदाब वाहिनीचे सुमारे 108 खांब आणि लघुदाब वाहिनीचे सुमारे 235 खांब कोसळले.

अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्यामुळे विस्तीर्ण भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत महावितरणच्या पथकांनी अथक परिश्रम घेऊन अनेक ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले. मात्र, काही दुर्गम आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागांत अद्यापही काम सुरू आहे.

नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन

सध्या उर्वरित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी, 20 निवडसूचीबद्ध ठेकेदार आणि त्यांचे सुमारे दीडशे कामगार मैदानात उतरले आहेत. हे सर्व जण युद्धपातळीवर काम करत असून मोडलेले खांब बदलणे आणि तुटलेल्या वाहिन्या जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे.

रविवारी संध्याकाळपर्यंत बहुतांश बाधित क्षेत्रातील वीजपुरवठा पूर्ववत होईल, असा विश्वास महावितरण प्रशासनाने व्यक्त केला होता. नैसर्गिक आपत्तीच्या या संकटकाळात नागरिकांनी संयम राखावा आणि वीज यंत्रणेपासून सावध राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्याला मोठा फटका

अवकाळी पावसाने संगमेश्वर तालुक्यातील महावितरणच्या गलथान कारभार उघड केला. पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत पूर्ण न केल्याने आणि नियोजनाचा अभाव असल्याने 24 ते 48 तासांपासून तालुक्यातील अनेक गावे अंधारात आहेत.

माभळे गावात पावसामुळे विजेचे खांब कोसळून मोठे नुकसान झाले. कसबा, पांगरी, माळवाशी: अनेक ठिकाणी झाडे विद्युत वाहक तारांवर कोसळल्याने पुरवठा खंडित झाला आहे.

लग्नसमारंभांना फटका

सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मात्र, दोन-दोन दिवस वीज नसल्याने साऊंड सिस्टम, रोषणाई आणि इतर कामांसाठी जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे, तर काही ठिकाणी कार्यक्रम रद्द करण्याची किंवा वेळेत बदल करण्याची नामुष्की आयोजकांवर आली आहे.

लोकप्रतिनिधींचा संताप

संगमेश्वर सभापती शर्वरी वेल्ये यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, पाऊस लवकर येण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, प्रशासकीय दुर्लक्षामुळे आज जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या शून्य नियोजनाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

कोकणच्या राजा लाही दणका

हापूस आंब्यावर निसर्गाचा मोठा कोप झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिह्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात, जेव्हा हंगाम पूर्ण तेजीत होता, त्याचवेळी आलेल्या या अस्मानी संकटामुळे काढणीला आलेला लाखो रुपयांचा आंबा मातीमोल झाला असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, झाडावर तयार झालेला आंबा एका झटक्यात जमिनीवर कोसळला. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावासह परिसरातील अनेक बागांमध्ये सोमवारी सकाळी आंब्यांचा अक्षरश: सडा पाहायला मिळाला. शेकडो पेट्या भरतील इतका आंबा झाडाखाली पडल्याने बागायतदारांचे डोळे पाणावले आहेत.

जमिनीवर पडलेला हा आंबा आता कवडीमोल भावाने विकला जाण्याची भीती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी बागायतदार सकाळपासून हा पडलेला माल गोळा करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे विदारक चित्र दिसत आहे.

झाडे उन्मळून पडल्याने दुहेरी फटका

केवळ फळांची गळच नाही, तर वादळाच्या तडाख्याने अनेक जुनी आणि मोठी आंब्याची झाडे मोडून पडली आहेत. वर्षानुवर्षे जपलेली झाडे जमीनदोस्त झाल्यामुळे बागायतदारांचे केवळ या हंगामाचेच नव्हे, तर कायमस्वरूपी नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून इतर झाडांचेही नुकसान झाले आहे. आधीच महागाई आणि मजुरीच्या प्रश्नाने ग्रासलेला कोकणचा आंबा शेतकरी या नैसर्गिक संकटामुळे आता पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे.

सरकारी मदतीची प्रतीक्षा

मे महिन्याचा शेवटचा आठवडा हा बागायतदारांच्या दृष्टीने हिशोबाचा आणि नफ्याचा काळ असतो. मात्र, निसर्गाने ऐनवेळी घात केलेल्या या घालामुळे हापूसच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. सोमेश्वरसह बाधित झालेल्या सर्व भागांचे तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बसला असून बळीराजा आता मदतीसाठी शासनाकडे डोळे लावून बसला आहे.

Advertisement
Tags :

.