For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News: रत्नागिरीच्या MIDC तील CNG पंप तात्पुरता बंद का ठेवलाय?

01:52 PM May 15, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri news  रत्नागिरीच्या midc तील cng पंप तात्पुरता बंद का ठेवलाय
Advertisement
व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन वस्तूस्थिती मांडली
रत्नागिरी : शहरातील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांना अज्ञात व्यक्तींकडून होणारी मारहाण आणि सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या दहशतीमुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी काम सोडले असून, व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून १२ मेपासून पंपाचे कामकाज तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन वस्तूस्थिती मांडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही व्यक्ती सीएनजी पंपावर येऊन तेथील कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापनाला विनाकारण अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत.
या घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीपोटी बहुतांश कर्मचाऱ्यांनी कामावर येणे बंद केले. अनेकांनी नोकऱ्या सोडल्याचे सांगितले जात आहे. नवीन कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत आणि जुने कर्मचारी परत येण्यास धजावत नसल्याने पंपाचे कामकाज चालवणे अशक्य झाले आहे.
पंप तात्पुरता बंद- व्यवस्थापन
सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील सीएनजी पंपावर पर्यटकांच्या वाहनांची मोठी गर्दी होत आहे. याठिकाणी वाहनचालकांना दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. येथील कर्मचाऱ्यांवर आधीच कामाचा अतिरिक्त ताण आहे.
अशा परिस्थितीत होत असलेल्या मारहाणीमुळे व्यवस्थापनाने हा कडक निर्णय घेतला आहे. नवीन कर्मचारी नेमणे आणि सुरक्षेचे योग्य नियोजन करण्यासाठी काही कालावधी आवश्यक असल्याने हा पंप तात्पुरता बंद ठेवल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे.
Advertisement

प्रशासनाकडून लवकरच कार्यवाही : रोहिणी रजपूत

हा सीएनजी पंप बंद झाल्यामुळे सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहनधारक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत असून अत्यावश्यक सेवा विस्कळीत झाली आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी म्हटले आहे.
Advertisement
Tags :

.