'१०८' रुग्णवाहिकेने वाचवले ३, ५६० ह्रदयविकाराशी लढणाऱ्या रुग्णांचे प्राण!
रुग्णवाहिकेतील प्राथमिक उपचार अन् डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे १० वर्षात घटले ह्रदयविकारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिह्यात आरोग्य यंत्रणेकडून राबवण्यात येणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेकडून गेल्या दहा वर्षात ह्रदयविकाराच्या तब्बल ३हजार ५६० रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले आहे. रुग्णवाहिकेत उपलब्ध प्राथमिक औषधे, प्रशिक्षित डॉक्टर तसेच चालकालाही असलेले प्राथमिक आरोग्याबाबतचे प्रशिक्षण यामुळे गेल्या १० वर्षात घरातून रुग्णालयापर्यंतच्या प्रवासात १०८ रुग्णवाहिका ही ‘जीवनरक्षक' बनत आहे.
उत्तम आरोग्य हे सर्वाना मिळालेले वरदान आहे. मात्र हेच आरोग्य उत्तम राखण्यासाठी योग्यवेळी रुग्णालयात उपचार मिळणे, ही सुद्धा तितकीच महत्वाची बाब आहे. अनेक गोरगरीब रुग्णांना योग्यवेळी रुग्णालयात पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी गेली १० वर्ष १०८ ही रुग्णवाहिका बजावत आहे. सध्या जिल्हाभरात उपलब्ध १७ रुग्णवाहिकांमध्ये ३६ प्रशिक्षित डॉक्टर काम पाहत आहेत. तर यापैकी १२ महिला डॉक्टर आहेत. गेल्या दहा वर्षात १०८ मुळे जिह्यातील ३ हजार ५६० ह्रदयविकाराच्या रुग्णांना रुग्णवाहिकेत मिळालेल्या प्राथमिक उपचारामुळे जीवदान मिळाले आहे.