रत्नागिरीला पावसाने झोडपले
रत्नागिरी :
गुरुवारी पहाटेपासूनच ढगफुटीसदृश मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक भागात जनजीवन विस्कळीत बनले आहे. या पावसामुळे समुद्राला उधाण आले असून त्याचा फटका सुरू झालेल्या किनारपट्टीवरील मासेमारीवर झाला आहे. नौकांनी बंदरांचा आश्रय घेतला आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी तसेच दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर 16 ऑगस्टपर्यंत हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40-50 कि.मी.पर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यावर्षी मे महिन्याच्या पंधरवड्यानंतर जिह्यात पावसाने हजेरी लावली. मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुसळधार कोसळल्यानंतर जून महिन्यात पावसाची बऱ्यापैकी हजेरी होती. जुलै महिन्यात मात्र पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले आहे. बुधवारी सायंकाळपासून विनाउसंत कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसानही केले. ऐन सणासुदीच्या तोंडावर बाजारपेठा गजबजलेल्या असताना पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे. गुरुवारी येथे पहाटेपासूनच अगदी दिवसभर आभाळ फाटल्यागत पडणाऱ्या पावसाने साऱ्यांनाच गारठवून टाकल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. लावणीची कामे आटपून समाधाकारक पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आले आहे. जुलै महिन्यात उघडीप दिल्याने भातावर करपा, किड रोग पडण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र 2 दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे भाताची वाढ झटपट होण्यास मदत होईल. मात्र मुसळधार पाऊस कायम राहिल्यास त्याचा फटका शेतीला बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
- मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर किनारपट्टीवर मासेमारीसाठी गेलेल्या नौका किनाऱ्यावर आश्रयाला आल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांना या कालावधीत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खोल समुद्रात उंच लाट उसळत असल्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांनी नौकांसह किनाऱ्यावर आश्रय घेतला आहे. त्यामुळे मासेमारी पूर्णत: ठप्प झाली आहे. जाकिमिऱ्या, पंधरामाड समुद्र किनारीही लाटांचे तांडव पहायला मिळत आहे. लाटा जोरदारपणे किनाऱ्यावर आदळत आहेत.
मासेमारी पूर्णत: ठप्प झाल्यामुळे शहरातील मिरकरवाडा बंदरातील मत्स्य विक्रीवर परिणाम झाला. श्रावण महिना सुऊ झाल्याने मस्त्य खवय्यांची संख्या कमी आहे. मात्र तरीही अनेक मत्स्य खवय्ये मासे खरेदीसाठी मिरकरवाडा बंदरात दाखल होत आहेत. नौका बंदरात उभ्या असल्याने अनेकांना रिकामी हाती परत जावे लागत आहे. तर किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्या नौकांमुळे उपलब्ध होणाऱ्या मासळीला सोन्याचा दर आला आहे. पापलेट 600 ऊ. किले, तर बोंबील 200 ऊ. किलोने विक्रीला जात आहे.
- कोकण अन् रत्नागिरी जिह्यासाठी हवामानाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण व महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 ते 19 ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या काळात कोकण व घाट क्षेत्रांमध्ये ठिकठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे, ज्याचा वेग ताशी 40-50 कि.मी.पर्यंत असू शकतो.
..