Konkan Rain Update: रत्नागिरीत धुवांधार, 24 तासांत 872.51 मिमी पावसाची नोंद, 3 लाखाचे नुकसान
आज, उद्या जिल्ह्याला हवामान विभागाचा ‘ऑरेंज अलर्ट’
रत्नागिरी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची जोरदार बॅटींग सुरु आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यात हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला 28 व 29 मे रोजी ऑरेंज अलर्ट तर 30 व 31 मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळीपर्यंत 24 तासात जिह्यात 872.51 मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान लांजा शहरातील श्रीराम पूल येथे मंगळवारी वहाळाला आलेल्या पुराचे पाणी थेट येथील नागरिकांच्या घरात शिरल्याची घटना घडली.
जिह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्याचे चित्र होते. मात्र दुपारपासून या पावसाने पुन्हा जोर धरला होता. ठिकठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्हाभरात मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात 3 लाखाहून अधिक नुकसान झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली.
झालेल्या नुकसानीत गुहागरमध्ये कोंडकाऊळ गावात दिशूद आजगोलकर यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले. मयुरी रोहिलकर यांच्या घराचे छत कोसळून नुकसान झाले. रामाणेवाडी येथील सार्वजनिक विहिरीचा बांध कोसळून 35 हजाराचे नुकसान, परचुरी खुर्द बौद्धवाडी येथे भिंत कोसळून 25 हजाराचे नुकसान झाले.
पांगारी तर्फे हवेली येथे हफीजा दळवी यांच्या मालकीचा गोठा कोसळून 31 हजाराचे नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यात तिवरेतर्फे देवळे येथे घरावर फणसाचे झाड कोसळून 30 हजाराचे नुकसान झाले. रत्नागिरी तालुक्यातील शीळ येथे ऊक्मिणी कदम यांच्या घराचे 60 हजार, तरवळ येथील दीपक धामणे यांच्या दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागून नुकसान झाले.
दापोली तालुक्यातील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून नुकसान तर स्मृती हुबणे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून 1 लाख 33 हजाराचे नुकसान झाले. पन्हळेतर्फे राजापूर येथे विजय गुरव यांच्या घरकुलातून बांधल्या जाणाऱ्या घराची भिंत कोसळून 30 हजाराचे नुकसान झाले.
जैतापूर आगरवाडी येथे रोहन शिवलकर यांच्या घराचे 10 हजाराचे नुकसान झाले. दांडेवाडी येथे इंद्रायणी मयेकर यांच्या घरावर झाड कोसळून 9 हजार तर सोलगाव येथे अनुसया परवडी यांच्या घरकुलमधून बांधलेल्या घरावर आंबा झाड कोसळून 10 हजाराचे नुकसान झाले.
जिल्ह्यात मंगळवारी झालेले पर्जन्यमान पुढीलप्रमाणे:
जिह्यात मागील 24 तासात मंडणगड 157 मि.मी., खेड 77.85 मि.मी., दापोली 141.71 मि.मी., चिपळूण 81.11 मि.मी., गुहागर 123 मि.मी., संगमेश्वर 52.50 मि.मी., रत्नागिरी 98.77 मि.मी., लांजा 67.20 मि.मी., राजापूर 73.37 मि.मी. पावसाची नोंद असून जिह्यात 872.51 मि.मी. पाऊस पडला.