For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ganeshotsav 2025: बाप्पा आले.. रत्नगिरी जिल्ह्यात आजपासून सर्वत्र गणरायाचा गजर!

12:39 PM Aug 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
ganeshotsav 2025  बाप्पा आले   रत्नगिरी जिल्ह्यात आजपासून सर्वत्र गणरायाचा गजर
Advertisement

जिल्ह्यात 1 लाख 69 हजार 552 गणेशमूतीची होणार प्रतिष्ठापना, स्वागताचा जोरदार माहोल

Advertisement

रत्नागिरी : आज प्रत्येक गणेशभक्तांच्या मनातील एक मंगलमय सोहळा म्हणून सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्साह संचारला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन मंगळपासूनच सुरू झाले. आता खऱ्या अर्थाने मिरवणुका काढून बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. जिल्ह्यात आज 1 लाख 69 हजार 552 गणेशमूर्तींची घरोघरी, सार्वजनिक मंडळ स्तरावर प्रतिष्ठापना होणार आहे.

जिल्ह्यात गणरायाच्या स्वागतासाठी प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आराध्यदैवत विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची तयारी जवळजवळ पूर्णत्वाला गेली आहे. गणेशभक्तांकडून घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमार्फत आकर्षक देखावे आणि रोषणाई करून बाप्पाचे स्वागत केले जाणार आहे. स्वागताचा सर्वत्र माहोल झाला आहे. सारे भक्तगण बाप्पाचे आगमन आणि त्याच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी दंग झाले आहेत.

Advertisement

गणेशचित्रशाळांमधून लाडक्या गणपती बाप्पाला नेण्यासाठी साऱ्या भक्तांची जोरदार लगबग सुरू आहे. यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष भर दिला जात आहे. शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना केली असून पर्यावरणपूरक सजावटीलाही गणेशभक्तांकडून पसंती दिली जात आहे.

पुढील 10 दिवस या उत्सवाच्या भक्तीमय वातावरणाला उधाण येणार आहे. जिह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बाप्पाच्या आगमनाचा हा उत्सव यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी प्रत्येकजण आतूर झाला आहे. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होणारा हा उत्सव अनंत चतुर्दशी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी बाप्पाच्या निरोपाने संपणार आहे.

जिल्ह्यात यावर्षी घरगुती गणेशमूर्तींची संख्या 1 लाख 69 हजार 426 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या 126 झाली आहे. एकूण आकडेवारीनुसार रत्नागिरी जिह्यात यंदा 1 लाख 69 हजार 552 गणेशमूर्तींची घरोघरी, सार्वजनिक मंडळ स्तरावर प्रतिष्ठापना होणार आहे. भक्तगणांची बाजारपेठांमध्ये मोठी रेलचेल वाढली आहे. चाकरमानी गावाकडे लाखेंच्या संख्येने आले आहेत. अजूनही अनेकजण दाखल होणार आहेत.

गणेशोत्सवाची जोरदार लगबग

गणेशोत्सवासाठी प्रशासनासह पोलीस दलही सज्ज झाले आहे. घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी गावी येऊ लागले आहेत. प्रत्येक गावामध्ये कुठे आरती....भजने...अनेक ठिकाणी शक्तीवाले व तुरेवाले जाखडी, डबलबारी तर काही ठिकाणी भजनांचे जंगी डबलबारीचे सामने रंगणार आहेत.

अनेक ठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांकडूनही चलचित्र देखावे साकारले जात आहेत. रत्नागिरीमध्ये श्री रत्नागिरीचा राजा, रत्नागिरीचा राजा आठवडा बाजार, बंदर रोड मित्रमंडळ गणेशोत्सव, टिळक आळीतील सार्वजनिक गणेशोत्सव, शांतीनगरचा राजा, उद्यमनगरचा राजा तसेच सार्वजनिक बांधकाम, शासकीय रुग्णालय नगर परिषद भूमी अभिलेख, पाटबंधारे, जिल्हा विशेष कारागृह अशा विविध कार्यालयांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाची जोरदार लगबग सुरू आहे.

प्रतिष्ठापना होणाऱ्या गणेशमूर्तींची संख्या खालीलप्रमाणे आहे:

पोलीस ठाणे घरगुती मूर्ती सार्वजनिक मूर्ती

  • रत्नागिरी शहर 7,913 27
  • रत्नागिरी ग्रामीण 1,306 50
  • जयगड 3,450 5
  • संगमेश्वर 13,544 2
  • राजापूर 20092 7
  • नाटे 7,078 4
  • लांजा 16,131 6
  • देवरूख 12,493 7
  • सावर्डे 12,022 1
  • चिपळूण 16,725 16
  • गुहागर 14,460 2
  • अलोरे 4,561 4
  • खेड 12,700 21
  • दापोली 6,335 9
  • मंडणगड 2,955 10
  • बाणकोट 682 2
  • पूर्णगड 3,721 1
  • दाभोळ 1,499 1
Advertisement
Tags :

.