Ratanagiri News: ‘गोविंदा आला रे’..., जिल्ह्यात 16 ऑगस्टच्या दहीहंडीचा उत्साह शिगेला
मंडळे नियोजनात दंग तर पोलीस प्रशासनही सज्ज
रत्नागिरी: ‘गोविंदा आला रे’...च्या जयघोषात आणि थरावर थर रचत रत्नागिरी जिल्हा 16 ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या रंगात रंगून जाणार आहे. यावर्षी जिह्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून तब्बल 2,750 दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सार्वजनिक दहीहंड्यांपेक्षा खासगी दहीहंड्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.
यावर्षीच्या या उत्सवासाठी सार्वजनिक दहीहंड्यांमध्ये लांजा तालुका आघाडीवर आहे. लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 82 सार्वजनिक दहीहंड्या बांधण्यात येणार आहेत. राजापूरमध्ये 40 आणि दापोलीमध्ये 38 दहीहंड्यांचा थरार पहायला मिळणार आहे.
खेडमध्ये 24 तर चिपळूणमध्ये 17, देवरुखमध्ये 12, पूर्णगडमध्ये 15, संगमेश्वर 8 असा दहीहंड्यांचा उत्साह असेल. तर सर्वात कमी सार्वजनिक दहीहंड्यांमध्ये अलोरे-शिरगाव 6, सावर्डे 2, गुहागर 3, बाणकोट 1, दाभोळ 4, मंडणगड 3 अशी दहीहंड्यांची नोंद करण्यात आली आहे.
खासगी दहीहंड्यांचा बाणकोटमध्ये बोलबाला आहे. येथील खासगी दहीहंड्यांचा विचार करता बाणकोट शहराने बाजी मारली आहे. येथे तब्बल 389 खासगी दहीहंड्या आयोजित बांधण्यात येणार आहेत. त्या पाठोपाठ चिपळूणमध्ये 320 आणि दापोलीमध्ये 327 दहीहंड्यांचा जल्लोष होणार आहे.
विशेष म्हणजे राजापूरमधील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही सार्वजनिक दहीहंडी नसतानाही 30 खासगी दहीहंड्यांचा उत्साह दिसून येणार आहे. त्या खालोखाल गुहागर 225, दाभोळ 257, मंडणगड 122, संगमेश्वर 120, खेड 150 दहीहंड्यांची नोंद करण्यात आली आहे. सर्वात कमी खासगी दहीहंडी अलोरे-शिरगाव 25, सावर्डे 52, राजापूर 70, देवरुख 57 अशी नोंद करण्यात आली आहे.