Ratnagiri News : चोरट्यांनी भरदिवसा घरासह दोन सदनिका फोडल्या
06:16 PM Jun 11, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
रत्नागिरी : शहरात मंगळवारी दिवसाढवळ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नाचणे सावंतनगर येथे चोरट्यांनी दोन सदनिका देखील फोडून सव्वाचार लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. हेमंतकुमार महेंद्र चोप्रा (५३, रा. नाचणे) यांच्या मालकीच्या घरामध्ये चोरी केली असून बिराज विश्वनाथ तोडणकर व आरती स्वप्नील पवार यांच्या सदनिका फोडल्या आहेत.
हेमंतकुमार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हेमंतकुमार हे ९ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४ च्या दरम्यान घराबाहेर गेले होते. याच कालावधीचा गैरफायदा घेत चोराने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कडीसहित उचकटून आत प्रवेश केला.
चोरट्याने घरातील लोखंडी आणि लाकडी कपाटांमधून फिर्यादींच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान साहित्य चोरून नेले. यासोबतच याच परिसरात राहणारे विराज विश्वनाथ तोडणकर आणि आरती स्वप्नील पवार यांच्या फ्लॅटमधूनही सोन्याचे दागिने चोरुन चोरट्यांनी पोबारा केला.
चोरीला गेलेल्या मालामध्ये ८० हजार रुपयांचा सोन्याचा हार, ४० हजारांच्या बांगड्या, २० हजारांची सोनसाखळी सोन्याच्या वेगवेगळ्या अंगठ्या, सोन्याचे ब्रेसलेट, मोत्यांच्या माळा आणि चांदीची भांडी (ताम्हन, पळी, तांब्या) यांचा समावेश आहे. याशिवाय बुद्धिबळाच्या सोंगट्या आणि गणपतीचे पेंडंट असे एकूण ४ लाख १६ हजार ७०० रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेले असल्याचे तक्रारीमध्ये नमुद करण्यात आला आहे.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच श्वानपथक व फॉरेन्सिक पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३३१ (३) आणि ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Advertisement
Advertisement