Accident News: कारच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, दोन महिलांसह बालिका गंभीर जखमी
रत्नागिरी-पावस मार्गावरील घटना, कारच्या दर्शनी भागाचे नुकसान
रत्नागिरी : रत्नागिरी-पावस मार्गावरील हॉटेल आनंद समोर रविवारी सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन महिला आणि एक सहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तेजश्री अमित मोहिले (36), तीर्था मुरकर (65) आणि महिशा अमित मोहिले (6, सर्व रा. शांतीनगर, रत्नागिरी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. तेजश्री मोहिले या रविवारी सायंकाळी आपली मुलगी आणि तीर्था मुरकर यांना दुचाकीवरून घेऊन रत्नागिरीहून पावसच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहिले यांची दुचाकी हॉटेल आनंद समोर आली असता, समोरून येणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटला. भरधाव वेगात असलेल्या या कारने मोहिले यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये दुचाकीचा पूर्णत: चक्काचूर झाला असून कारच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवले. या घटनेची प्राथमिक नोंद रुग्णालयातील पोलीस चौकीत करण्यात आली असून, पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.