For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेशन दुकानदारांची कमिशनची रक्कम आता जिल्हा पंचायतीकडे

01:17 PM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
रेशन दुकानदारांची कमिशनची रक्कम आता जिल्हा पंचायतीकडे
Advertisement

गेल्या सात महिन्यांपासून दुकानदार कमिशनच्या प्रतीक्षेत : नोव्हेंबरचे रेशन अद्याप नाही

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे कमिशन गेल्या 7 महिन्यांपासून थकविण्यात आले आहे. त्यामुळे चालू महिन्यातील 16 तारीख उलटली असली तरी अद्याप रेशन वितरणाला सुरुवात झालेली नाही. रेशन दुकानदारांना अनेक अडचणींना सामना करण्याची वेळ आली असतानाच राज्य सरकारकडून जमा केली जाणारी कमिशनची रक्कम रेशन दुकानदारांच्या खात्याऐवजी जिल्हा पंचायतीकडे जमा केली जाणार आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांच्या समोर ही आणखी नवीन समस्या उभी ठाकली आहे.

रेशन कार्डधारकांना प्रति माणसी 5 किलो तांदूळ केंद्र सरकारकडून तर उर्वरित 5 किलो तांदूळ राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेंतर्गत दिला जात आहे. सदर कमिशनची रक्कम रेशन दुकानदारांच्या खात्यात जमा केली जात आहे. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून राज्य सरकारद्वारे दिली जाणारी कमिशनची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत बहुतांश ठिकाणी रेशन वितरण पूर्ण होते. पण चालू महिन्यात 16 तारीख उलटली तरी रेशन वितरणाला अद्याप सुरूवात झालेली नाही.

Advertisement

5 किलो तांदळाच्या मोबदल्यात केंद्र सरकारला बिल अदा न केल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून रेशन कार्डधारकांना इंदिरा किटचे वितरण केले जाणार होते. मात्र, ही योजना जानेवारी महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. 2003 मध्ये रेशन कार्डधारकांची ईकेवायसी करण्याचे आदेश दुकानदारांना बजावण्यात आले होते. यासाठी प्रति माणसी 5 रुपये प्रमाणे दिले जातील असे सांगण्यात आले होते. पण अद्यापही सदर रक्कम दुकानदारांना मिळाली नाही. याबाबत राज्य रेशन दुकानदार असोसिएशनच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला.

पण सध्याचे अधिकारी याबाबत हात वर करत असल्याने रेशनदुकानदारांनी घेतलेली मेहनत वाया जाण्याचा धोका आहे. या महिन्यातील रेशन वितरणाला 18 तारखेपासून सुरूवात होण्याची शक्यता आहे. पण महिन्याच्या शेवटी सर्व्हर समस्या उद्भवल्यास पुन्हा रेशन वितरणाला विलंब होण्याची शक्यता आहे. गेल्या 7 महिन्यांपासून कमिशनच्या प्रतीक्षेत असलेल्या दुकानदारांना राज्य सरकारने आणखी एक झटका दिला आहे. यापूर्वी थेट दुकानदारांच्या बँक खात्यात जमा केली जाणारी कमिशनची रक्कम आता जिल्हा पंचायतीकडे जमा केली जाणार आहे. तेथून कमिशनची रक्कम दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. या सर्व अनागोंदी कारभाराबाबत कर्नाटक राज्य सरकारी रेशन वितरक संघाचे उपाध्यक्ष राजशेखर तळवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.