For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

ऊसदराचा आज फैसला

07:40 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऊसदराचा आज फैसला
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती : शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या निर्णयाकडे

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

ऊसदराच्या प्रश्नावरून राज्यभर सुरू असलेला संघर्ष व शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ऊसदराची कोंडी फुटण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा करून शेतकरी व साखर कारखानदार या दोन्ही घटकांच्या हिताचा विचार करून सुवर्णमध्य साधला जाईल आणि अंतिम ऊसदर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

Advertisement

मंगळवारी दिवसभर ऊसदराबाबत बैठका सुरू होत्या. एकीकडे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. ऊसदर निश्चित करण्यासाठी शेतकरी संघटना व साखर कारखानदारांसोबत आतापर्यंत दोन ते तीन बैठका घेण्यात आल्या असून प्रत्येक बैठकीत दोन्ही बाजूंच्या मागण्या व भूमिका जाणून घेण्यात आल्या आहेत. मंगळवारीही जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत ऊसदरावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बुधवारी दराबाबत अंतिम निर्णय घेण्याचे संकेत दिले.

पालकमंत्री म्हणाले, ऊसदराचा प्रश्न हा शेतकरी व साखर कारखानदार या दोन्ही घटकांशी संबंधित आहे. कारखानदारांची दराबाबत एक भूमिका असून शेतकऱ्यांची मागणी वेगळी आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या मागण्यांचा विचार न करता एकतर्फी निर्णय घेणे शक्मय नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे, तर कारखानदारांच्या आर्थिक अडचणींचाही विचार करावा लागणार आहे. या दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधून सर्वांना समाधानकारक ठरेल, असा दर निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. पालकमंत्री म्हणून या प्रश्नावर सुवर्णमध्य काढण्याची जबाबदारी आमची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कारखानदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न

बुधवारी पुन्हा एकदा साखर कारखानदारांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या व सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कारखानदारांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ऊसदराच्या प्रश्नावर आता अधिक विलंब न करता कोंडी फोडणे आवश्यक आहे. त्यामुळे बुधवारी दराबाबत निर्णय घेण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय नंतर

ऊसदर व प्रोत्साहनपर अनुदान या दोन्ही विषयांवर शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. मात्र, सध्या सर्वाधिक महत्त्व ऊसदराचा प्रश्न मार्गी लावण्याला आहे. त्यामुळे प्रथम ऊसदर निश्चित करून जाहीर केला जाईल. प्रोत्साहनपर अनुदानाबाबतचा निर्णय त्यानंतर घेण्यात येईल. एमएसपीबाबत जो निर्णय होईल, त्यानुसार पुढील अंमलबजावणी केली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. साखरेच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे ऊसदर निश्चित करताना सदर परिस्थितीचाही विचार केला जात आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा व कारखानदारांनाही परवडणारा दर असावा, या दोन्ही बाबींचा समतोल साधून निर्णय घेण्याचा प्रयत्न असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले.

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाकडे लक्ष

उसाला योग्य दर मिळावा, यासाठी शेतकरी संघटनांनी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन तीव्र केले आहे. शेतकऱ्यांकडून वाढीव ऊसदर, एमएसपी व प्रतिटन एक हजार ऊपयांचे प्रोत्साहनपर अनुदान यांसह विविध मागण्या करण्यात येत आहेत. दुसरीकडे साखर कारखानदारांनीही आपल्या आर्थिक अडचणी मांडल्या आहेत. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.

दराबाबत उत्सुकता

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बुधवारी निर्णय जाहीर करण्याचे दिलेले आश्वासन महत्त्वपूर्ण मानले जात आहे. दराबाबतचा निर्णय लांबल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांना कितपत न्याय देते आणि कारखानदारांशी चर्चेतून नेमका कोणता दर निश्चित होतो, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष दराची घोषणा होण्याची प्रतीक्षा असून बुधवारी होणारा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णायक ठरणार आहे.

दर जाहीर न झाल्यास जेल भरो

बुधवारी ऊसदराची कोंडी न फुटल्यास राज्य शेतकरी संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर ऊस दराचा प्रश्न न सुटल्यास जेल भरो आंदोलन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असून सरकारने याचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता बुधवारच्या दर घोषणेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दिवसभर ऊसदराचा प्रश्न चर्चेत

मंगळवारी दिवसभर ऊसदराचा प्रश्न चर्चेत राहिला. दरासाठी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत होते. सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी समोरील मार्गावर रास्ता रोको करून आंदोलन छेडले. यानंतर राणी चौकात निदर्शने करून मोर्चा जिल्हा पंचायतीकडे वळविण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी नेत्यांची बैठक घेण्यात आली. मात्र सदर बैठकही निष्फळ ठरल्याने शेतकरी नेत्यांची रात्रीपर्यंत स्वतंत्र्य बैठक घेण्यात आली. यावेळी विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आदी उपस्थित होते.

: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम दर जाहीर करणार

: शेतकरी-कारखानदारांमध्ये सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न

: प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय नंतर

Advertisement
Tags :

.