For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रीय मराठा पार्टी 10 जागा लढविणार

10:37 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रीय मराठा पार्टी 10 जागा लढविणार
Advertisement

उपाध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांची माहिती

Advertisement

बेळगाव : राज्यामध्ये पन्नास लाखांपेक्षा अधिक मराठा समाजाची संख्या आहे. मात्र, या समाजाला कोणत्याच राजकीय पक्षांकडून न्याय देण्यात आलेला नाही. केवळ मराठा समाजाचा मतदानासाठी उपयोग करून घेण्यात आला आहे. या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व राजकीय पक्षांना आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये दहा मतदारसंघांतून राष्ट्रीय मराठा पार्टीतर्फे उमेदवार उभे केले जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय मराठा पार्टीचे उपाध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटक राज्यात मराठा समाजाची संख्या मोठी असली तरी हा समाज एकत्रित नसल्याने विखुरला गेला आहे. राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भाजप व काँग्रेसकडून नेहमीच मराठा मतदारांची मदत घेतली जात आहे. मात्र, या मतदारांना न्याय मिळवून दिलेला नाही. समाजातील नेत्यांना कोणत्याही पदावर स्थान देण्यात आलेले नाही. त्यांना राजकीयरीत्या पुढे येण्यासाठी वाव देण्यात आलेला नाही. समाजातील नेत्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये तिकीट देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. यापूर्वीही अनेक वेळा राजकीय स्तरावर मराठा समाजाला स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांकडून मराठा समाजाला स्थान दिलेले नाही. केवळ मराठा समाजाच्या मतांचा लाभ करून घेतला आहे. त्यांच्या विकासाच्यादृष्टीने कोणतेच निर्णय घेतले नाहीत. मराठा समाजाचा आवाज दिल्ली दरबारी घुमावा यासाठीच राष्ट्रीय मराठा पार्टीतर्फे निवडणूक लढविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर कर्नाटकामध्ये मराठा समाज अधिकरीत्या संघटित आहे. यासाठी उत्तर कर्नाटकावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बेळगाव, चिकोडी, कारवार, बिदर, हावेरी, बागलकोट, शिवमोगा, विजापूर, धारवाड या लोकसभा मतदारसंघांतून उमेदवार उभे केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अॅड. ईश्वर घाडी, विनोद साळुंखे आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.