For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रकुल पदक विजेते शिवाजी चिंगळे यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

10:17 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रकुल पदक विजेते शिवाजी चिंगळे यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू
Advertisement

मुचंडी यात्रेवरून परतताना अपघात : सांबरा ग्रामस्थांतून हळहळ

Advertisement

वार्ताहर /सांबरा

मुचंडी येथील रेल्वे फाटकानजीक रेल्वेरूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने सांबरा येथील निवृत्त सुभेदार मेजर ऑनररी पॅप्टन व राष्ट्रकुल पदक विजेते, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी चिंगळे (वय 75) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रेल्वे पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रकुल पदक विजेते व आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच शिवाजी निंगाप्पा चिंगळे हे रविवारी सकाळी चालत मुचंडी येथील सिद्धेश्वर मंदिराला गेले होते. श्री सिद्धेश्वर देवाचे दर्शन घेऊन ते मधल्या वाटेने सांबऱ्याकडे चालले होते. यावेळी रेल्वेरूळ ओलांडताना दुपारी साडेबाराच्या सुमारास बेळगावहून कोल्हापूरकडे चाललेल्या हरिप्रिया एक्स्प्रेसची त्यांना जोराची धडक बसली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

शिवाजी चिंगळे यांना कमी ऐकू येत होते. त्यांनी रविवारी श्रवण यंत्र घातले नव्हते. त्यामुळे त्यांना रेल्वेचा आवाज ऐकू आला नसावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या धडकेमध्ये त्यांच्या मृतदेहाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. रेल्वेची धडक बसलेल्या ठिकाणापासून सुमारे 200 मीटरपर्यंत त्यांच्या मृतदेहाचे अवयव विखुरले होते. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. 16 मराठा लाईट इन्फंट्रीमधून पंधरा वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये पदके पटकाविली होती. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी हे चावडी गल्ली, सांबरा येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राध्यापक अमित चिंगळे यांचे ते वडील होत.

सलग दोन दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू

शनिवार दि. 20 रोजी चावडी गल्ली, सांबरा येथील शिवगौडा रामगौडा देसाई यांचे अपघाती निधन झाले होते तर त्याच गल्लीतील शिवाजी चिंगळे यांचा रविवारी रेल्वे अपघातात मृत्यू झाला. एकाच गल्लीमध्ये समोरासमोर राहणाऱ्या दोघांचाही सलग दोन दिवसांमध्ये मृत्यू झाल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.