रश्मिकाकडून ‘थामा’च्या चित्रिकरणाला प्रारंभ
अभिनेत्री रश्मिका मंदानाने आयुष्मान खुरानासोबतचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘थामा’चे चित्रिकरण सुरू केले आहे. पुढील काही दिवसांपर्यंत रात्री चित्रिकरण करावे लागणार आहे. याचमुळे केवळ चंद्र, कॅमेऱ्याचा प्रकाश आणि ताऱ्यांविषयीच पोस्ट आणि कहाण्या पहायला मिळतील असे रश्मिकाने चाहत्यांना उद्देशून म्हटले आहे.
थामा या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करत आहे. रश्मिकाने आदित्यचे छायाचित्र पोस्ट करत ‘माझा दिग्दर्शक दरवेळी नाइट शूट करवितो, आइस बकेट, माझ्या जीवनाची कहाणी’ अशी कॅप्शन जोडली आहे.
थामा हा चित्रपट हॉरर-कॉमेडी असण्यासोबत रोमँटिक देखील असेल. चित्रपटाची कहाणी एका अपूर्ण प्रेमकहाणीच्या अवतीभवती घुटमळणारी असेल. आयुष्मानसोबत रश्मिका यात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल देखील दिसून येणार आहेत. हा चित्रपट चालू वर्षात दिवाळीच्या आसपास प्रदर्शित होणार आहे.
दिनेश विजन आणि अमर कौशिक यांच्याकडून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाची कहाणी नीरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फुलारा यांनी लिहिली आहे.