‘मायसा’मध्ये रश्मिका मुख्य भूमिकेत
रश्मिका मंदाना ही देशभरात जबरदस्त पॅनबेस असलेली अभिनेत्री आहे. आगामी चित्रपट ‘मायसा’मधील तिचा लुक सादर करण्यात आला आहे. या चित्रपटातील तिचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. रश्मिका आता मायसा या चित्रपटाद्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती एका योद्ध्याची भूमिका साकारणार असल्याचे समजते. पोस्टरमध्ये तिचे वेगळे रुप दिसून येत आहे. रश्मिका स्वत: देखील या चित्रपटावरून अत्यंत उत्सुक दिसून येत आहे. तिने चित्रपटाचे शीर्षक आणि लुक सोशल मीडियावर शेअर करत खास कॅप्शन दिली आहे. ‘मी नेहमीच काही तरी नवे, काही वेगळे, काही रोमांचक देण्याचा प्रयत्न करते आणि हा काहीसा तसाच प्रोजेक्ट आहे. माझे असे रुप जे मी देखील आजवर पाहिले नव्हते,
हे संतापाने युक्त, अत्यंत दमदार आणि अत्यंत खरे रुप आहे. मी काहीशी घाबरले आहे, परंतु अत्यंत आनंदी देखील आहे. आम्ही काय तयार करतोय हे तुम्हा सर्वांना दाखविण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही’ असे रश्मिकाने नमूद केले आहे. मायसा हा एक भावुक अन् अॅक्शननी युक्त कहाणी असलेला चित्रपट आहे. यात एका आदिवासी समुदायाची पार्श्वभूमी दाखविण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रविंद्र पुल्ले यांनी केले आहे. चित्रपटातील जग, रश्मिकाचा लुक, व्यक्तिरेखा आणि कहाणी, प्रत्येक गोष्ट अत्यंत खरी असावी अशी आमची इच्छा होती. ही कहाणी जगाला ऐकविण्यासाठी आम्ही आता तयार आहोत, असे पुल्ले यांनी म्हटले आहे.