राशी भविष्य २०२६-मीन
जिथे लोकांचा विचार करणे बंद होते, तिथून मीन राशीच्या व्यक्तींचा विचार करणे सुरू होते. हे लोक त्यांचे पैसे खूप विचारपूर्वक खर्च करतात. विश्वासघात वगळता काहीही सहन करू शकतात. बहुतेक लोकांना वाचन आणि लेखनाची आवड असते. इतरांवर जास्त विश्वास ठेवतात, ज्यामुळे फसवणूक होऊ शकते. लहानसहान गोष्टींवरून दु:खी होणे, मनाची चंचलता, भावनिकता असे गुण असतात. विचार न करता निर्णय घेतात. या व्यक्तींवर विश्वास ठेवणे जरा कठीणच असते. कारण दुसऱ्या कोणाचेही सिक्रेट या व्यक्तींना ठेवता येत नाही.
मीन राशीचे लोक बोलण्यापूर्वी दोनदा विचार करतात. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप लवचिक आहे. कामाच्या ठिकाणी छाप पाडण्यासाठी सतत कठोर परिश्रम करता. कलाप्रेमी असतात. ते बुद्धिमान आणि सुसंस्कृत लोकांकडे आकर्षित होतात. इतरांचे शांतपणे ऐकतात. तुमची मुख्य ताकद कल्पनाशक्ती आहे आणि म्हणूनच तुम्ही सर्जनशील आहात. अहंकार असू शकत नाही. परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेता. दयाळू, सहनशील, समर्पित आणि प्रामाणिक आहात. इतरांबद्दल सहानुभूती आणि करुणा असते. ते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राखतात. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक बाबींमध्ये रस असतो. नेहमीच इतरांना मदत करण्यास तयार असतात. प्रेमसंबंधांमध्ये उत्साही आणि रोमँटिक असतात. सत्यवचनी असून फसवणूक करत नाहीत. खूप संवेदनशील असतात आणि इतरांच्या बोलण्याने सहजपणे दुखावले जातात. इतरांवर अवलंबून राहणे आवडत नाही. मीन राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप रहस्यमय असते. त्यांच्याबद्दल अंदाज लावणे फार कठीण आहे. स्वभावाने अतिशय धार्मिक असून त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे लोक खूप बुद्धीवादी असतात. लवकर कंटाळतात आणि विचलित होऊ लागतात. अतिशय सहानुभूतीपूर्ण असतात. यांना स्वप्नवत जगात राहायला आवडते. त्यांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध आवडत नाहीत, ते स्वत:चे निर्णय स्वत: घेतात.
बोलण्याच्या बाबतीत ते फटकळ असतात. ते कोणतेही काम खूप विचार करून करतात. कोणत्याही वातावरणात लवकर जुळवून घेतात. कोणतीही परिस्थिती सहज समजू शकतात. प्रवास करणे खूपच आवडते. आपल्या रोजच्या आयुष्यात कितीही थकवा असला तरीही फिरायला जाण्यासाठी या व्यक्ती एका पायावर तयार असतात. यांच्या फिरण्याच्या स्वभावामुळेच या व्यक्तींना निसर्गात रमायला आणि साहसी गोष्टी करायला आवडतात. मीन राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप रहस्यमय असते. त्यांच्याबद्दल अंदाज लावणे फार कठीण आहे. हे लोक स्वभावाने अतिशय धार्मिक असतात. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे लोक खूप बुद्धीवादी असतात. हे लोक इतरांवर अवलंबून राहू इच्छित नाहीत. हे लोक लवकर कंटाळतात आणि विचलित होऊ लागतात. उधार दिलेल्या पैशासाठी ते पाठपुरावा करत नाहीत.
ग्रहमान
वर्ष आरंभ ते एक जूनपर्यंत गुरु मिथुन राशीत आहे. एक जून ते 31 ऑक्टोबर गुरु कर्क राशीला जाणार. पुढे ऑक्टोबर 31 ते 24 जानेवारी 2027 पर्यंत गुरु सिंह राशीला असून पुन्हा वक्रगत्य कर्क राशीला येत आहे. चतुर्थातील मिथुनेच्या गुरूमुळे स्थावर वास्तू खरेदी विक्री संभावणार आहे. वाहन सुखसुद्धा चांगले लाभणार आहे. मात्र वाहन सावकाश चालवलं पाहिजे. पंचमेतील कर्केचा गुरु सर्व बाबतीत आपल्यासाठी शुभकारक राहणार आहे. बऱ्याच अडचणी कमी होत जाणार आहेत. विवाहासाठीसुद्धा गुरुबळ सुरू होणार आहे. विद्यार्थी वर्गांसाठी हा गुरु अतिशय शुभकारक राहणार आहे. ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते, त्यांना पूर्ण करण्याची संधी लाभणार आहे. ज्याला उच्च शिक्षण घ्यायचे आहे किंवा नवीन तंत्रज्ञान किंवा कोर्सेस करायचे आहेत, त्यांच्यासाठी हा कालखंड शुभदायक राहणार आहे, अनेकांना संततीप्राप्तीसुद्धा होणार आहे.
शनी महाराजांचे भ्रमण वर्षभर तुमच्या राशीतूनच होत आहे. कर्तव्यदक्ष झाले पाहिजे. मोठी जबाबदारी घेण्यासाठी मानसिकता तयार केली पाहिजे. शांत व प्रयत्नवादी बुद्धिमत्तेने तुम्ही कामात यश मिळवू शकाल. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला अडचणी येणार आहेत. मात्र तुम्ही त्याच्यावर धीर गंभीर राहून मार्ग शोधले पाहिजेत. शनी साडेसातीमधील मधला अडीच वर्षाचा व खडतर कालखंड सुरू आहे. शनि हा कर्म अधिपती असल्यामुळे कर्मावर आपण जास्त विश्वास ठेवून आपले काम आपण नित्य नियमाने करत गेले पाहिजे.
25 नोव्हेंबरपर्यंत राहू बारावा राहणार आहे. हा राहूसुद्धा तितकासा शुभ नाही.खर्चामध्ये विनाकारण वाढ होऊ शकते. तब्येत बिघडू शकते. आपत्ती येऊ शकते.जवळजवळ सर्व बाबीमध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. कोणावरही विश्वास न ठेवलेला बरे. बाधित जागेमध्ये जाणे टाळले पाहिजे. केतूचे भ्रमण सहाव्या स्थानी होत आहे. वृत्ती जरी धाडसी बनणार असली तरी हाताखालच्या लोकांपासून आपल्याला त्रास होणार आहे. कुणालाही शब्द देताना विचारपूर्वक द्यावा. एक जूनपासून गुरु आपल्यासाठी शुभकारक राहणार आहे.
नोकरदार
कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही चिंताग्रस्त राहाल. प्रवासाचा काही लाभ होणार नसल्याने तो शक्यतो टाळा. नाहक खर्चाची शक्यता असल्याने या संदर्भात काळजी घ्या. मित्र आणि सहकाऱ्यांशी सांभाळून वागा. तुमची निर्णय घेण्याची आणि तरतमभाव जाणण्याची क्षमता काही प्रसंगी क्षीण होईल. आक्रमक होऊ नका. मित्रांसोबत शक्यतो सामोपचाराने वागा. त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आर्थिक चढ-उतार संभवतात. परिवारातील एकोपा आणि सामंजस्यात अभाव होण्याची शक्यता. आई व पत्नी यांच्यात वाद संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. डोकेदुखी, डोळ्यांचे विकार, पोटाचे विकार, पायात सूज येणे या आजारांवर ताबडतोब उपचार करा.
कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि कामाच्या दबावामुळे तुमच्या कारकीर्दीमध्ये काही अडथळे निर्माण होतील. ही परिस्थिती हाताळ्यासाठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबिण्याची गरज आहे. नवे प्रकल्प आणि करिअरमध्ये धोके पत्करू नका. संवाद साधताना सकारात्मक राहा. बोलताना किंवा लिखित स्वरूपात अपमानकारक शब्दांचा वापर करू नका. विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध सलोख्याचे राहणार नाहीत. जोडीदाराची प्रकृती सांभाळावी लागेल. टीम वर्कमध्ये तुमच्या मताला आव्हान दिले जाऊ शकते. मुलाखत किंवा पदोन्नतीसाठी प्रयत्न करताना तुम्हाला इतरांकडून कडक स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. शांतपणे काम करणे हाच एकमेव उपाय आहे. संघर्ष यशाचा मार्ग मोकळा करेल. प्रेमसंबंधांमध्ये वाद आणि अहंकाराचा संघर्ष होऊ शकतो. विवाहित लोकांमध्ये काही कौटुंबिक बाबींवर मतभेद होऊ शकतात. या कालावधीत तुमचे एकूणच वर्तन साधारण राहील. कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. काही समस्या आणि आरोग्याचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यांचा तुमच्या कामावर परिणाम होईल.
स्त्री वर्ग
या कालावधीत तुमचे एकूणच वर्तन साधारण राहील. फलाची अपेक्षा न करता काम करत राहावे लागेल. या काळात काही समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यांचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आव्हाने आणि नव्या घटकांना काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेणे टाळा. तुमचा जुळवून घेण्याचा स्वभाव आणि स्पर्धा यामुळे या काळात तुमच्यासमोर अडथळे निर्माण होतील. जमीन किंवा यंत्राची खरेदी काही काळ पुढे ढकला. तुमच्या कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. ताणतणाव वाढेल. खर्चावर ताबा न ठेवल्यास आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दु:ख देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल. त्यामुळे धीर बाळगून वाट पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे.
सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये. मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक वागा. वादविवाद टाळा. उद्योगासाठी हा चांगला कालावधी नाही आणि आर्थिक नुकसान संभवते. काही गुप्त कामांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव आणि दु:ख सहन करावे लागेल. वाहन सांभाळून चालवा. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. नवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी योग्य कालावधीची वाट पाहावी लागेल. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. हा तुमच्यासाठी मिश्र घटनांचा कालावधी आहे. सर्दी किंवा तापासारखे विकार संभवतात. विनाकारण मानसिक तणाव राहील. कारकीर्दीत दबाव निर्माण होईल. तुमचे आप्तेष्ट आणि नातेवाईक यांच्याशी असलेल्या नात्यात दुरावा निर्माण होईल. रोजच्या कामाकडे नीट लक्ष द्या. मोठी गुंतवणूक फारशी लाभदायी असणार नाही. धूर्त मित्रांपासून सावध राहा.
विद्यार्थी
तुमचे कठोर परिश्रम सुरू ठेवा. स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा कठोर परिश्रम करण्याचा काळ आहे. येणाऱ्या काळात यश मिळविण्यासाठी तुमचे प्रयत्न प्रभावी ठरतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. विद्यार्थी यावेळी कोणत्याही परीक्षेत चांगली कामगिरी करून आपली क्षमता सिद्ध करू शकतात. अभ्यासक्रमांसाठी नवीन योजना बनवाल. मौजमजेसोबतच, शिक्षणावरही तुम्ही बारकाईने लक्ष ठेवाल. नवीन विषयांबद्दल तुमची उत्सुकता वाढेल. विज्ञान, कला आणि तांत्रिक शिक्षणात तुमची आवड वाढेल.
- राशीस्वामी - गुरु
- शुभवार - गुरुवार
- अशुभ वार - शुक्रवार
- घात मास - फाल्गुन
- शुभ रंग - पिवळा
- भाग्यरत्न - पुष्कराज
- आराध्य देवता - श्री दत्त गुरु