केळशीत आढळला ‘दुर्मीळ’ सागरी विंचू
दापोली / प्रतिक तुपे :
जगभरात महागडे लोकप्रिय सागरी खाद्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली शेवंड अर्थात सागरी विंचू हा कोकणपट्ट्यात दुर्मिळ आहे. येथे तो 1 टक्क्यापेक्षाही कमी आढळतो. कोकण पट्ट्यात त्याला सागरी विंचू असेदेखील संबोधित केले जाते. पंचतारांकित रेस्टॉरंमध्ये ‘लॉब्स्टर’ म्हणून सागरी विंचूचा समावेश असलेली महागडी डीश मिळते. तालुक्यातील केळशी येथील नुकताच चिखली शेवंड अर्थात सागरी विंचू सापडून आला. परंतु कधीतरी क्वचितच निदर्शनात हा सागरी विंचू पडतो. त्यामुळे त्याचे अनेकांना कुतूहूल बनत आहे.
‘मड लॉबस्टर’ अर्थात त्याला मराठीत ‘चिखली शेवंड’ किंवा चिखली कोळंबी देखील म्हणतात. हे सागरी प्राणी चिखलात आणि गाळात राहतात. त्यांच्या शरीरावर मजूबत कवच असते. मजबूत पाय आणि मजबूत शेपटी असते. हे प्राणी दिवसभर बिळात लपून राहतात आणि रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. शेवंड हा लहान मासे, मृदुकाय प्राणी, पाणवनस्पती आणि समुद्रतळाशी कुजलेले मांस खातात. रात्रीच्या वेळी ते बाहेर पडत असल्याने त्यांना सूर्यास्तानंतर पकडण्यात येते.

- अमेरिकेत रेस्टॉरंट साखळी
चिखली शेवंड हा एक अपृष्ठवंशीय संधिपाद जलचर आहे. कोळंबीसारखा दिसणारा पण आकाराने बराच मोठा असतो. यापासून अमेरिकेत मेन या प्रातांतील उपाहारगृहांत ‘लॉब्स्टर आईसक्रीम’ ही तयार केले जाते. शेवंडात मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. युरोप आणि अमेरिकेत रेड लॉब्स्टर नावाची रेस्टॉरंट साखळी पद्धतीने चालवली जातात.
- कोकणात दुर्लक्षित
परंतु कोकणात अर्थात अरबी समुद्रात याच्यावर फार लक्ष केंद्रीत करण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे. सागरी विंचू म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. कोळंबी शेती केली जाते. परंतु या महागड्या असलेल्या चिखली शेवंड फार दुर्लक्षित रहात असल्याचे समोर आले आहे. एकंदरीत कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर 1 टक्क्यापेक्षाही कमी प्रमाणात आढळून येत असल्याने त्याकडे कोणी लक्ष देत नाही. शिवाय हे प्राणी सूर्यास्तानंतर बाहेर पडत असल्याने आणि चिखलात रहात असल्याने त्यांना शोधणे देखील कठीण बनते. त्यामुळे याकडे फार लक्ष दिले जात नसल्याचे समोर आले.