For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Rare Animals | चिपळूणात दुर्मिळ 'माऊस डियर' आढळले

04:42 PM Jun 12, 2026 IST | NEETA POTDAR
rare animals   चिपळूणात दुर्मिळ  माऊस डियर  आढळले
Advertisement
डी. बी. जे. महाविद्यालया परिसरात या दुर्मिळ वन्यप्राण्याचे दर्शन
चिपळूण : शहरातील डी. बी. जे. महाविद्यालया परिसरात भारतातील सर्वात लहान हरिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माऊस डियर (Indian Chevrotain) या दुर्मिळ वन्यप्राण्याचे दर्शन घडल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. येथील रहिवासी बाळकृष्ण शंकर पालकर यांना त्यांच्या घरामागील कंपाऊंडलगतच्या भिंतीजवळ झाडाझुडुपांमध्ये लपून बसलेले हे माऊस डियर दिसून आले. त्यांनी त्याचे छायाचित्रही टिपले.

काहीवेळ परिसरात थांबल्यानंतर हा प्राणी जवळच्या डोंगराच्या दिशेने निघून गेला. माऊस डियर हा अत्यंत लाजाळू व निशाचर स्वभावाचा प्राणी असून तो प्रामुख्याने रात्रीच्या वेळीच बाहेर पडतो. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष दर्शन होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. घनदाट जंगल, झुडपी भाग आणि मानवी वर्दळ कमी असलेले परिसर हे त्याचे अधिवास मानले जातात.

Advertisement

 

विशेष म्हणजे यापूर्वीही चिपळूणमधील कचरा मैदान परिसरात सकाळच्या वेळी डॉ. विक्रम घाणेकर यांना रस्त्यावरून जाताना माऊस डियर दिसले होते. त्यामुळे चिपळूण परिसरातील जंगलपट्ट्यात या दुर्मिळ प्राण्याचे अस्तित्व असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वन्यजीव अभ्यासकांच्या मते, माऊस डियरचे अस्तित्व हे त्या परिसरातील जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोलाचे द्योतक मानले जाते.

त्यामुळे अशा दुर्मिळ प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी त्यांना कोणताही त्रास न देता वन विभागाला माहिती देणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या दुर्मिळ पाहुण्याच्या दर्शनाची चर्चा रंगली असून, चिपळूण परिसरातील समृद्ध वनसंपदेची ही आणखी एक नोंद मानली जात आहे.

Advertisement

 

 

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.