For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Great Indian Bustard | कोल्हापुरात अत्यंत दुर्मिळ 'माळढोक' पक्ष्याचे दर्शन; पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण

12:49 PM Jul 14, 2026 IST | NEETA POTDAR
great indian bustard   कोल्हापुरात अत्यंत दुर्मिळ  माळढोक  पक्ष्याचे दर्शन  पक्षीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण
Advertisement

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अत्यंत संकटग्रस्त आणि दुर्मिळ पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'माळढोक' या पक्ष्याची कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशी जलाशय परिसरात नोंद करण्यात आली आहे. हा परिसर माळढोकसाठी राखीव असलेल्या अधिवासापासून सुमारे २९० किलोमीटर अंतरावर असल्याने, ही नोंद केवळ दुर्मीळ निरीक्षण नसून, माळढोकाच्या संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वाची व आशादायी घटना मानली जात आहे.

Advertisement

'इंडियन बर्डस्' या प्रसिद्ध संशोधन नियतकालिकात याबद्दलचा अभ्यास अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. विवेकानंद महाविद्यालयाचे राहुल कांबळे, गजानन सोनटक्के आणि सागर व्हनाळकर या संशोधकांना १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास कुंभारवाडी येथील तुळशी जलाशयाच्या काठावर एक प्रौढ मादी माळढोक दिसून आली. उघड्या गवताळ परिसरात ही मादी शांतपणे अन्न शोधत होती. निरीक्षकांना पाहताच ती सतर्क झाली आणि काही वेळाने पश्चिमेकडे उडून गेली. त्यानंतर अनेकदा शोध घेऊनही हा पक्षी पुन्हा दिसून आला नाही.

संशोधकांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार, २०१९ ते २०२४ या काळात सोलापूर परिसरात एक एकटी मादी माळढोक सातत्याने नोंदवली गेली होती, जी अलीकडच्या काळात दिसेनाशी झाली होती. तुळशी जलाशयावर दिसलेली मादी ही तीच असण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. मात्र, पक्ष्याला 'सॅटेलाईट टॅग' नसल्यामुळे याची खात्री पटलेली नाही.

Advertisement

तुळशी जलाशयाचा सुमारे १३५ हेक्टरचा परिसर हा मोकळी गवताळ जमीन, पडीत शेती आणि जलाशयाचे किनारे यामुळे माळढोकासाठी पोषक ठरला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. दाट जंगलाऐवजी मोकळ्या आणि विरळ झुडपांच्या जागा या पक्ष्याला अन्न शोधण्यासाठी आणि दूरवर नजर ठेवण्यासाठी अनुकूल असतात. माळढोक हा पक्षी गवताळ प्रदेशातील परिसंस्थेचा आरसा मानला जातो. तो अत्यंत संवेदनशील असून मानवी हस्तक्षेपामुळे आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात झालेली ही नोंद या पक्ष्याच्या हालचाली समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.