भंगारात सापडली 300 वर्षांपूर्वीची दुर्मीळ मूर्ती
इंग्लंडमधील एका जुन्या वस्तूंच्या यार्डमध्ये साधी संगमरवरी मूर्ती समजून दुर्लक्ष करण्यात आलेली कलाकृती प्रत्यक्षात जवळपास 300 वर्षे जुनी असल्याचे उघड झाले आहे. प्रसिद्ध इटालियन शिल्पकार पिएत्रो ब्राची यांनी तयार केलेली ही मूर्ती पोप क्लेमेंट बारावे यांचे चित्रण करते. तज्ञांनी तिचे ऐतिहासिक आणि कलात्मक महत्त्व ओळखल्यावर त्या मूर्तीची चर्चा आंतरराष्ट्रीय कला जगतात सुरू झाली.
ही घटना इंग्लंडमधील विल्टशायर परिसरातील जुन्या वस्तूंच्या पुनर्वापराच्या यार्डमध्ये घडली. तेथे ठेवलेली सुमारे 68 सेंटीमीटर उंचीची संगमरवरी मूर्ती एका कलासंग्राहकाच्या नजरेस पडली. यार्डच्या मालकांना ती साध्या काँक्रिटच्या वस्तूसारखी वाटत होती. मात्र संग्राहकाने तिचे महत्त्व ओळखून ती केवळ 300 पौंडांना खरेदी केली.
त्यानंतर त्याने ही मूर्ती तज्ञांकडे तपासणीसाठी नेली. तपाससणीत ही कलाकृती अठराव्या शतकातील प्रख्यात इटालियन शिल्पकार पिएत्रो ब्राची यांची असल्याचे निश्चित करण्यात आले. लिलावासाठी तिची प्राथमिक किंमत 10 हजार पौंडापर्यंत ठरविण्यात आली होती. मात्र अधिक मागणीमुळे किंमत अधिक ठरण्याची शक्यता आहे.
पिएत्रो ब्राची हे अठराव्या शतकातील रोममधील प्रसिद्ध बारोक शिल्पकार होते. रोममधील जगप्रसिद्ध ट्रेवी कारंज्याच्या मध्यभागी असलेली ओशेनेस देवतेची संगमरवरी मूर्ती घडवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. नव्याने ओळखण्यात आलेली मूर्ती पोप क्लेमेंट बारावे (1652-1740) यांची आहे. रोमन सेनेटने पोपांनी कॅपिटोलाइन संग्रहालयासाठी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ त्यांचा कांस्य पुतळा निर्माण करण्याची जबाबदारी ब्राची यांच्यावर सोपवली होती. त्यासाटी तयार केलेली ही संगमरवरी प्रतिकृती सुमारे 1736 मधील असल्याचे मानले जाते.
मूळ कांस्य पुतळा 1798 साली वितळवण्यात आला. त्यामुळे त्याचे स्वरुप दाखवणारे एकमेव ज्ञात चित्र पूर्वी एका जुन्या कोरीव चित्राच्या स्वरुपात उपलब्ध होते. नव्याने सापडलेली संगमरवरी प्रतिकृती ही त्या नष्ट झालेल्या कलाकृतीची एकमेव ज्ञात शिल्लक प्रतिकृती असू शकते असे तज्ञांचे मत आहे.
अनेक दशके बागेत पडून
ही कलाकृती इंग्लंडमधील हॅम्पशायरमधील अँडोव्हरजवळील एका घराच्या बागेत अनेक दशके ठेवण्यात आली होती. बाहेरील वातावरणामुळे मूर्तीवर डाग पडले होते आणि तिच्यावर शेवाळही वाढले होते. त्यामुळे तिचे मूळ संगमरवरी स्वरुप ओळखणे कठीण झाले होते. ही मूर्ती इंग्लंडमध्ये कशी पोहोचली याचे निश्चित उत्तर अद्याप मिळालेले नाही. अठराव्या शतकातील इटलीला भेट देणाऱ्या एखाद्या ब्रिटिश सरदाराने ती आणली असावी किंवा राजनैतिक भेट म्हणून ती इंग्लंडमध्ये आली असावी अशी शक्यता आहे.
या मूर्तीचा लिलाव पूर्वी 8 ऑक्टोबर रोजी होणार होता. मात्र काही कारणांमुळे तो ऐनवेळी मागे घेण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्षात ही मूर्ती किती किमतीला विकली गेली याची पुष्टी झालेली नाही.