तात्काळ उपचारासाठी रॅपिड रिस्पॉन्ड टीम सज्ज
आरोग्य खात्याकडून तयारी
बेळगाव : पावसाचा जोर वाढल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. काही भागात पाणी वाढत असल्याने तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. चिकोडी तालुक्यात कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. अशा ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याकडून रॅपिड रिस्पॉन्ड पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होणाऱ्या भागात आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा आरोग्य खात्याने आवश्यक ती तयारी केली आहे. आरोग्य खात्याच्या सर्व्हेनुसार 166 गावांमध्ये पूरस्थिती येण्याची शक्यता आहे. यादृष्टीने आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी तालुकास्तरावर आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून 427 गंजी केंद्रे उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सदर केंद्रांमध्ये आसरा घेणाऱ्या नागरिकांना आरोग्य सुविधा देणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य खात्याकडून तालुकानिहाय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पावसामुळे आजारही वाढत आहेत. त्यामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया, थंडताप या आजारांसाठी आवश्यक असणारी औषधे संबंधित आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरोग्य सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये, तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना करण्यात आली आहे. याकरिता रॅपिड रिस्पॉन्ड टीम नियुक्त करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
गरजेच्या ठिकाणी तात्काळ आरोग्य सुविधा पुरविणार
पूरस्थिती उद्भवल्यास निवारा केंद्रांमध्ये आश्रय घेणाऱ्या नागरिकांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी व गरजेच्या ठिकाणी तात्काळ आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य खात्याकडून रॅपिड रिस्पॉन्ड टीम नियुक्त करण्यात आली आहे.
-डॉ. महेश कोणी, जिल्हा आरोग्याधिकारी