विमान प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ
ऑक्टोबरमध्ये 29 हजार प्रवाशांचे उड्डाण
बेळगाव : बेळगाव विमानतळावरून अनेक शहरांच्या फेऱ्या टप्प्याटप्प्याने रद्द होत असल्या तरी प्रवासी संख्या मात्र दिवसागणिक वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यात 29 हजार 142 प्रवाशांनी विमानप्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. सप्टेंबरच्या तुलनेत 10 टक्यांनी प्रवासी संख्या वाढल्याचे चित्र दिसून येत असल्याने विमानफेऱ्या वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सप्टेंबर महिन्यात 26 हजार 338 विमानप्रवाशांनी प्रवास केला होता. ऑक्टोबरमध्ये तीन हजार प्रवाशांची यामध्ये वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये 430 विमानांच्या फेऱ्या झाल्या असून 2.2 मेट्रिक टन कार्गोची वाहतूक करण्यात आली आहे. प्रवासी संख्या झपाट्याने वाढत असल्याने त्याच मानाने विमानफेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे. नोव्हेंबर महिन्यात ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. सध्या इंडिगो एअरलाईन्सकडून बेंगळूर, दिल्ली, हैदराबाद या शहरांना दैनंदिन सेवा तर स्टार एअरकडून अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर या शहरांना आठवड्यातील काही मोजके दिवस विमानसेवा देण्यात येत आहे. महत्त्वाच्या शहरांची विमानसेवा बंद होऊनही प्रवासी संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.