मार्कंडेयच्या पाणीपातळीत झपाट्याने घट
पाणी प्रदूषणाचा प्रश्न, शेतकऱ्यांत चिंता : लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेण गरजेचे
बेळगाव : तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेयच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. त्याबरोबर नदीत टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे नदीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जानेवारी महिन्यातच काही ठिकाणी नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. नदीतील पाण्याचा शेतीला वापर व्हावा यासाठी उचगाव, आंबेवाडी, कंग्राळी आणि इतर ठिकाणी बंधाऱ्यावर फळ्या घालण्यात आल्या आहेत. मात्र काही ठिकाणी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. ज्याठिकाणी पाणी आहे,
त्याठिकाणी कचरा तरंगू लागला आहे. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. बंधाऱ्याजवळ प्लास्टिक बॉटल, कचरा आणि इतर साहित्य साचून राहिले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मार्कंडेय नदीतील दूषित पाण्याचा प्रश्न कायम राहिला आहे. बैलूर येथे उगम पावलेली मार्कंडेय पुढे बेळवट्टी, राकसकोप, बेळगुंदी, सोनोली, बाची, कल्लेहोळ, उचगाव, सुळगा, हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, कंग्राळी खुर्द, जाफरवाडी, कडोली, गौंडवाड, काकती, होनगा आदी गावातील शिवारातून प्रवाहीत होते. नदीकाठावर हजारो एकर शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये ऊस आणि रब्बी हंगामात भाजीपाला व कडधान्याची पेरणी केली जाते. मात्र नदीतील दूषित पाणी आणि कमी झालेली पातळी यामुळे शेती पिकांचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
अतिपावसामुळे पाणीपातळी टिकून
यंदा पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयाची पाणी पातळी टिकून आहे. मात्र दुसरीकडे मार्कंडेयच्या पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे नदीकाठावरील पिकांचा प्रश्न उद्भवत आहेत. त्याबरोबर नदीतील पाणी पातळी घटल्याने नदीकाठावर असलेल्या विहिरी आणि कूपनलिकांचेही पाणी खाली गेले आहे. एकीकडे नदीतील पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे. तर दुसरीकडे नदीच्या पाण्यात कचरा आणि प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहणार काय? हेच आता पहावे लागणार आहे.