शहरात रॅपिड अॅक्शन फोर्स दाखल
गँगवाडी, वड्डरवाडी येथील यात्रेनिमित्त पोलिसांची खबरदारी, माळमारुती परिसरात पथसंचलन
बेळगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या गँगवाडी आणि वड्डरवाडी येथील यात्रेनिमित्त पोलीस आयुक्तालयाच्यावतीने बंदोबस्तासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स मागविण्यात आली आहे. पोलीस आणि आरएएफ जवानांच्यावतीने माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत पथसंचलन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शहर व उपनगरात सातत्याने अप्रिय घटना घडत आहेत. त्यामुळे समाजातील शांतता भंग होण्यासह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पोलीस खाते अलर्ट मोडवर असल्याचे दिसून येत आहे.
अलीकडेच संतिबस्तवाड येथे घडलेल्या एका घटनेनंतर शहरात अद्यापही तणावाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे सण-उत्सवावेळी बंदोबस्त ठेवताना पोलीस खात्याकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांचा भरणा अधिक आहे. तसेच गँगवाडी आणि वड्डरवाडी येथील यात्रा लवकरच होणार आहे. सदर यात्रा शांततेत व उत्साहात पार पडावी, यात्राकाळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली परिसरात पथसंचलन करण्यात आले.